पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींसह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव, तृणमूल काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना मतदारांनी नाकारलं
युवराज जाधव May 05, 2026 10:13 PM

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तृममूल काँग्रेसला पराभूत करत सत्ता मिळवली आहे. भाजपनं 207 जागांवर विजय मिळवला तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर विजय मिळाला. ममता बॅनर्जी यांनी या निवडणूक निकालानंतर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. पश्चिम बंगालधील तृणमूल काँग्रेसचे एकूण 22 मंत्री पराभूत झाले आहेत. 

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या सरकारमधील ममता बॅनर्जी यांच्यासह 35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव झाला आहे. यावरुन बंगालमधील तृणमूल सरकार विरोधातील लाट आणि मंत्र्यांची घटलेली लोकप्रियता दिसून येते.  35 पैकी 22 मंत्र्यांचा पराभव म्हणजे 63 टक्के मंत्री पुन्हा विजयी होण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींच्या सरकारमधील मातब्बर नेत्यांचा पराभव झाला आहे, ज्यांच्याकडे महत्त्वाच्या विभागांचं मंत्रिपद होतं. सूत्रांच्या माहितीनुसार मतदारांनी महिला व बाल विकास मंत्री, उद्योग, गृहनिर्माण, ऊर्जा, शिक्षण, परिवहन आणि सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्‍यांना नाकारलं आहे. 

कोणत्या मंत्र्यांचा पराभव?

भवानीपूर: ममता बनर्जी (मुख्यमंत्री)  
टॉलीगंज : अरूप बिस्वास (गृहनिर्माण, ऊर्जा)  
डमडम : ब्रत्य बसू (उच्च शिक्षण, प्राथमिक शिक्षण)  
डमडम उत्तर : चंद्रिमा भट्टाचार्य (पर्यावरण, वित्त)  
श्यामपुकूर :शशि पांजा (उद्योग, वाणिज्य आणि उद्यम; महिला व बाल विकास आणि समाज कल्याण)
बिधाननगर : सुजीत बोस (आतप्कालीन सेवा) 
चंदननगर :इंद्रनील सेन (तंत्र शिक्षण, प्रशिक्षण आणि कौशल्य विकास; पर्यटन)
सिंगूर : बेचाराम मन्ना (कृषी विपणन), 
पूर्बस्थली दक्षिण : स्वपन देबनाथ (पशुसंवर्धन विकास) 
माल: बुलु चिक बड़ाईक (मागास वर्ग कल्याण, आदिवासी विकास)  
दुर्गापुर पूर्व : प्रदीप के मजूमदार (सहकार, पंचायत आणि ग्राम विकास)
बिनपूर : बिरबाहा हांसदा (वन, स्वयं सहायता गट आणि स्वयंरोजगार)  
सबांग : मानस रंजन भुइयां (जलसिंचन आणि जलमार्ग, जल संधारण आणि विकास) 
आसनसोल उत्तर : मोलॉय घटक (श्रम)
मोंटेश्वर : सिद्दीकुल्लाह चौधरी (लोकशिक्षण विस्तार आणि ग्रंथालय सेवा) 
दिनहाटा : उदयन गुहा (उत्तर बंगाल विकास)
मनबाजार: संध्यारानी टुडू (पश्चिमांचल विकास) 
सागर : बंकिम चंद्र हाजरा (सुंदरबन विकास )  
कृष्णानगर दक्षिण: उज्ज्वल बिस्वास (विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि जैव तंत्रज्ञान) 
जंगीपारा :  स्नेहाशीष चक्रवर्ती (परिवहन)  
सालबोनी: श्रीकांत महतो  (ग्राहक,राज्य मंत्री)  
हेमताबाद : सत्यजीत बर्मन (शालेय शिक्षण राज्यमंत्री)  

तृणमूल काँग्रेसचे उद्योग, वाणिज्य आणि उद्यम मंत्री शशी पांजा हे श्यामपुकुर मतदारसंघातून भाजपच्या पौर्णिमा चक्रवर्ती यांच्याकडून 14600 मतांनी पराभूत झाले. उत्तर बंगाल विकास मंत्री उदय गुहा हे दिनहाटा मतदारसंघातू भाजपच्या अजय राय यांच्याकडून 17400 मतांनी पराभूत झाले. पश्चिम बंगालचे सहकार मंत्री प्रदीप मजूमदार दूर्गापूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चंद्रशेखर बॅनर्जी यांच्याकडून 30900 मतांनी पराभूत झाले. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.