Nagaraj Manjule Khashaba Movie Controversy: दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) कायमच त्यांच्या चित्रपटांमुळे, त्याच्या कथेवरून चर्चेत असतात. सध्या चर्चा आहे त्यांच्या खाशाबा या चित्रपटाची. दिला अनेक दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. आता या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. न्यायालयात दावा सुरू असताना या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्याने या चित्रपटाच्या स्थगितीबाबत नागराज मंजुळे यांच्यासह या चित्रपटाच्या निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ आणि आटपाट प्रोडक्शनला पुणे सत्र न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. कोर्टाने या संदर्भात आपले म्हणणे मांडण्यासाठी 8 मे पर्यंत मुदत दिली आहे. (Khashaba Movie Controversy)
नागराज मंजुळे यांनी डिसेंबर 2024 मध्ये खाशाबा या चित्रपटाची घोषणा केली होती. 'फॅन्ड्री' आणि 'सैराट'नंतरचा हा त्यांनी दिग्दर्शित केलेला तिसरा चित्रपट असणार होता. यावेळी त्यांनी सिनेमाचं पोस्टरही शेअर केलं होतं. ऑलम्पिकच्या इतिहासात भारताचा आणि महाराष्ट्राचं नाव गौरवाने नोंदणाऱ्या अत्यंत प्रतिभावान पहिलवान खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावरचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा वादाच्या भोवऱ्यात सापडली. कारण ही मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची आहे. या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. त्यामुळे चित्रपटाचा निर्मिती आणि प्रदर्शन थांबवण्यासाठी त्यांनी पुणे सत्र न्यायालयात दावा दाखल केला होता.
या पुस्तकाच्या कॉपीराईटचा दावा न्यायालयात सुरू असतानाही 1 मे पासून चित्रपटगृहांमध्ये खाशाबा या चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात येत आहे. याचा दाखला देत चित्रपट प्रदर्शन करण्यास स्थगिती देण्यात यावी, यासाठी डॉक्टर रवींद्र शिंदे व डॉक्टर सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात 2 मे रोजी अर्ज दाखल केला. या अर्जाची तातडीने दखल घेत कोर्टाने नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्या ज्योती देशपांडे, जिओ स्टुडिओ यांना नोटीसा पाठवले आहेत. 8 मे रोजी आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबा जाधव हे प्रतिभावंत कुस्तीपटू होते. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत,ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. भारत सरकारने खाशाबा जाधव यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. आतापर्यंत वेगवेगळ्या खेळांवर तसेच खेळाडूंवर अनेक चित्रपट बनवण्यात येतात. ते बॉक्स ऑफिसवर यशस्वी होतानाही दिसतात. मराठीतील एका खेळाडूवर आधारित असा चित्रपट जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रोडक्शन्स घेऊन येत आहे. या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे व नागराज मंजुळे यांची आहे. दिग्दर्शनही नागराज मंजुळे यांनीच केले आहे.