टोल प्लाझा हटवणार| रस्ते वाहतुक आणि टोल हे विषय नेहमी चर्चेत असतात. टोल आणि वाद हेही समीकरण मध्यंतरी चांगलेच ऐरणीवर आले होते. आता याच टोलच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक नवीन योजना आणत असल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या नवीन प्रणालीत वाहनांना आता टोल नाक्यावर थांबण्याची गरज भासणार नाही. पाहुया याबाबतचे सविस्तर वृत्त.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, २०२६ च्या अखेरपर्यंत देशभरातील टोल प्लाझा रद्द केले जाऊ शकतात. त्यांच्या जागी एक नवीन प्रणाली आणली जाईल, ज्यामध्ये वाहने न थांबता प्रवास करू शकतील आणि कापलेल्या अंतरावर आधारित टोल आकारला जाईल.
टाइम्स ग्रुपच्या ‘टाइम्स ड्राइव्ह ऑटो समिट अँड अवॉर्ड्स २०२६’ च्या कार्यक्रमात त्यांनी ही माहित दिली. ते म्हणाले की नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. याअंतर्गत वाहनांना टोल नाक्यांवर थांबावे लागणार नाही. ही प्रणाली आधीच ८५ टोल नाक्यांवर लागू करण्यात आली असून, या वर्षाच्या अखेरपर्यंत ती देशभरात लागू करण्याची योजना आहे.
टोलचा खर्च वाचणार
नितीन गडकरी म्हणाले की, नवीन प्रणाली नंबर प्लेट ओळख तंत्रज्ञान आणि फास्टॅगवर आधारित असेल. गडकरींनी दावा केला की, या नवीन प्रणालीमुळे प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होईल. सध्याचा १२५-१५० रुपयांचा टोल सुमारे १५ रुपयांपर्यंत कमी केला जाऊ शकतो. त्यांनी ३,००० रुपयांच्या पासचाही उल्लेख केला, ज्यामुळे २०० टोल नाक्यांवरून प्रवास करणे शक्य होईल. ते म्हणाले की, दिल्ली-जयपूर, दिल्ली-डेहराडून, अमृतसर, कटरा आणि श्रीनगरसह अनेक महामार्ग कॉरिडॉरवर काम वेगाने सुरू आहे. त्यांनी दिल्ली-चेन्नई आणि चेन्नई-बंगळूरू द्रुतगती मार्ग प्रकल्पांमधल्या होत असलेल्या प्रगतीचाही उल्लेख केला.
बॅरियर – लेस – टोलिंग प्रणालीची घोषणा
तत्पूर्वी, नितीन गडकरी यांनी भारतातील पहिल्या मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) बॅरियर-लेस टोलिंग प्रणालीच्या शुभारंभाची घोषणा केली. गुजरातमधल्या एनएच-४८ च्या सुरत-भरूच विभागातील चोर्यासी टोल प्लाझा येथे ही प्रणाली सुरू करण्यात आली , ज्यामुळे वाहनांना न थांबता टोल भरता येतो. ही आधुनिक प्रणाली ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) आणि फास्टॅग (FASTag) यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करते, ज्यामुळे वाहन पुढे जात असतानाच टोलची कपात करता येते.