विधानसभा निवडणुकीचं दणक्यात सेलिब्रेशन करणाऱ्या थलपती विजयवर दुःखाचा डोंगर, दिला अखेरचा निरोप
Marathi May 07, 2026 04:25 PM

Thalapathy Vijay Emotional Tribute Producer RB Choudary: अभिनयाला अलविदा म्हणत राजकारणात पाऊल ठेवलेल्या थलपती विजय (Thalapathy Vijay) यानं नुकत्याच झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Legislative Assembly Elections) इतिहास रचला. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत अत्यंत दणदणीत यश मिळवत ‘थलपती विजय’ यानं सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. आता लवकरच तामिळनाडूमध्ये ‘थलपती विजय’च्या TVK चं सरकार स्थापन होणार असून ‘थलपती विजय’ मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असल्याचं बोललं जात आहे. पण, एकीकडे जंगी सेलीब्रेशन सुरू असतानाच आता ‘थलपती विजय’वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘थलपती विजय’च्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय.

तामिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आर.बी. चौधरी काळाच्या पडद्याआड (Producer R.B. Choudhary Passes Away) गेले असून त्यांचं भीषण रस्ते अपघातात निधन झालं आहे. त्यांच्या निधनानं थलपती विजय पुरता खचल्याचं पाहायला मिळालं. विजयनं बुधवारी निर्माते आर.बी. चौधरी यांना अखेरचा निरोप देत श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी थलपती विजय भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. निर्माते आर.बी. चौधरी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना विजय भावूक झालेला. त्यानंतर त्यानं निर्मात्यांचा मुलगा अभिनेता ‘जीवा’ची भेट घेतली आणि त्याला घट्ट मिठी मारुन ढसाढसा रडला.

सोशल मीडियावर जीवा आणि थलपती विजय यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये, ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाचे प्रमुख असलेला विजय निर्माते  आर.बी. चौधरी यांच्या  पार्थिवावर पुष्पहार अर्पण करताना दिसतोय. त्यानंतर त्यांनं निर्मात्यांचा धाकटा पुत्र, अभिनेता जीवा याची भेट घेतली. विजयनं जीवाला घट्ट मिठी मारली आणि दोघेही ढसाढसा रडू लागले. अत्यंत भावूक करणारा आणि डोळ्यांच्या कडा पाणावणारा हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

निर्माते आर.बी. चौधरी यांचं रस्ते अपघातात निधन

आर.बी. चौधरी यांचं मंगळवार, 5 मे 2026 रोजी राजस्थानमधील उदयपूर इथे एका दुर्दैवी कार अपघातात निधन झालं. जड अंतःकरणानं निर्मात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जेव्हा विजय तिथे पोहोचला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून ही दुःखद बातमी ऐकून तो किती खोलवर हादरून गेला, हे स्पष्ट दिसून येतंय. दुःखाच्या या कठीण प्रसंगी, विजय यांनी आर. बी. चौधरी यांच्या कुटुंबाला धीर आणि आधार दिला. विजय यांनी मिठी मारताच, निर्मात्यांचे पुत्र जीवा यांचा बांध फुटला आणि ते एखाद्या लहान मुलाप्रमाणे हंबरडा फोडून रडू लागले.

आर.बी. चौधरी यांच्या निधनानं इंडस्ट्रीवर शोककळा

अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. रजनीकांत यांनीही ट्वीट करत त्यांना आदरांजली अर्पण केलीय. त्यांनी लिहिलं की, “माझे प्रिय मित्र आर. बी. चौधरी हे एक उत्कृष्ट निर्माते आणि अत्यंत सज्जन व्यक्ती होते. अनेक तरुण दिग्दर्शकांना संधी देऊन त्यांनी सिनेसृष्टीला चैतन्यमय ठेवलंय. त्यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीनं मला मोठा धक्का बसला असून मी अत्यंत व्यथित झालोय. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…”

थलपती विजयबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांच्या राजकीय पदार्पणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यांचा पक्ष, ‘TVK’, हा तामिळनाडू विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. दरम्यान, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 जागांच्या आकड्यापेक्षा त्यांच्याकडे सध्या 10 जागा कमी आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी, TVK ला इतर पक्षांशी युती करावी लागेल. मिडिया रिपोर्टनुसार, TVK हा पक्ष DMK (59 जागा) सोबत हातमिळवणी करू शकतो, तर काहींच्या मते AIADMK (47 जागा) सोबत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.