ठाण्यात दरडींचे 14 ‘डेंजर झोन’, घरे तातडीने रिकामी करण्याचे महापालिकेचे आदेश
Marathi May 08, 2026 08:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पावसाळा तोंडावर आला असतानाच ठाणे शहरात दरडींचे 14 डेंजर झोन असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. डोंगरावर तसेच डोंगराच्या पायथ्याशी हजारो घरे असून तेथील रहिवासी जीव मुठीत धरून राहात आहेत. विशेषतः लोकमान्यनगर, पातलीपाडा, आतकोनेश्वरनगर, घोलाईनगर, आझादनगर या भागांत पावसाळ्यामध्ये दरडी कोसळण्याची भीती असल्याने घरे तातडीने रिकामी करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेने दिले आहेत. दरडप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांना नोटिसादेखील बजावण्यात आल्या आहेत. पावसाळा जवळ आला असताना आता आम्ही जायचे कुठे, असा प्रश्न या नागरिकांना पडला आहे.

दरवर्षी ठाणे महापालिका मान्सून पूर्व तयारीचा आढावा घेत असते. 14 एप्रिल रोजी झालेल्या विशेष बैठकीमध्ये शहरातील भूस्खलनाचा धोका असलेल्या ठिकाणांवर चर्चा करण्यात आली. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका क्षेत्रात दरडीचे 14 डेंजर झोन असल्याचे सांगण्यात आले. त्याची गंभीर दखल उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी घेतली असून त्यांनी संबंधित क्षेत्रातील प्रभाग समित्यांना नोटिसा बजावण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.

येथे आहे गंभीर धोका

  • लोकमान्यनगर – गुरुदेव आश्रम परिसर, उपवन.
  • माजिवडा-मानपाडा – डोंगरीपाडा, पातलीपाडा आणि कळशीपाडा.
  • कळवा – आतकोनेश्वरनगर, पौंडपाडा, शिवशक्तीनगर, घोलाईनगर, वाघोबानगर आणि भास्करनगर.
  • मुंब्रा – आझादनगर, गावदेवी मंदिरालगतचा भाग, केणीनगर, सैनिकनगर आणि कैलासनगर.

ठाणे शहरात पूर्वी 26 दरडप्रवण ठिकाणे होती. विविध उपाययोजनांनंतर ही संख्या 14 वर आली असली तरी या भागांमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत.

17 जुलै 2021 रोजी कळव्यातील घोलाईनगर येथे दरड कोसळून पाचजणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर उपाययोजनांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अनेक कुटुंबे अद्यापही त्याच अवस्थेत राहात आहे.

आर्थिक अडचणी, पर्यायी निवासाची कमतरता आणि रोजगाराच्या कारणांमुळे अनेक नागरिक स्थलांतरास तयार नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.