पुणे - जिल्ह्यातील धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये ४७.१३ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच २३.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी या दरम्यान ३२.९२ (१६.६० टक्के) पाणीसाठा उपलब्ध होता. गतवर्षीच्या तुलनेमध्ये ७.१६ टक्के अधिक जलसाठा आहे. पुढील काही दिवस शेतकऱ्यांनी पाण्याचे काटेकोर नियोजन केल्यास संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी राहू शकते, असा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या पन्नासहून अधिक टँकर जिल्ह्यातील विविध तालुक्यात सुरू आहेत. त्यामध्ये आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. शेतीच्या मशागतीलाही पावसाने अडथळा ठरत होता, एवढ्या सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरु होती. त्याचा फायदा रब्बी हंगामालाही झाला.
जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये एकूण उपयुक्त साठवण क्षमता १९८.३४ टीएमसी असून, गेल्या वर्षी पावसाळ्यानंतर २०२.६७ टीएमसी (१०२ टक्के) इतका साठा नोंदवला गेला होता. मागील सहा महिन्यांत झालेल्या वापरामुळे सध्या धरणांमध्ये सुमारे २३ टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्या धरणांत पाणीसाठा समाधानकारक असला तरी पुढील काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पाण्याची मागणी वाढून धरणांतील साठा झपाट्याने कमी होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने वर्तविली आहे.
सात धरणांतून आवर्तन सुरू
सध्या उन्हाळी पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध राहावे, यासाठी चालू महिन्यांपासून धरणांतून आवर्तन सुरू करण्यात आले आहे. याचा लाभ आंबेगाव, शिरूर, खेड, इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना होत आहे. सध्या खडकवासला, चासकमान, वीर, पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड आणि उजनी या सात धरणांतून कालव्यांसह बंद जलवाहिनीद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा आहे.