- राजेंद्र व्यास
गंगापूर - गंगापूर तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे राष्ट्रीय महामार्गावर ढोरेगाव परिसरात शुक्रवारी दुपारी भीषण अपघात झाला. नातेवाईकाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत छत्रपती संभाजीनगर येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय तेजल काकासाहेब प्रधान हिचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात तिचे वडील काकासाहेब गिरजाबा प्रधान (४६) गंभीर जखमी झाले आहेत.
नेमकं काय घडलं?
आंबेलोहोळ येथील रहिवासी काकासाहेब प्रधान मुलगी तेजलसह बगडी येथे हळदीच्या कार्यक्रमाला दुचाकीने निघाले होते. दुपारी ढोरेगाव शिवारातील शिवना नदीच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेमुळे दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
स्थानिकांनी तातडीने दोघांना गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी तपासून तेजलला मृत घोषित केले. गंभीर जखमी काकासाहेब यांना प्रथमोपचारानंतर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
आदल्या दिवशीच दिला होता शेवटचा पेपर
तेजल अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. तिने जिल्हा परिषद शाळेतून दहावी ९४% गुणांसह पास केली होती. सध्या ती शासकीय तंत्रनिकेतन, छत्रपती संभाजीनगर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारी (ता. ७) तिचा प्रथम वर्षाचा शेवटचा पेपर झाला होता. आनंदात घरी परतलेल्या तेजलवर दुसऱ्याच दिवशी काळाने झडप घातली.
शोकाकुल वातावरणात गुणवंत विद्यार्थीनीचा अंत्यसंस्कार
शवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री ९ वाजता आंबेलोहोळ येथे तेजलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनमिळाऊ स्वभावाच्या तेजलच्या जाण्याने आंबेलोहोळ परिसरावर शोककळा पसरली आहे. तिच्या पश्चात आई, वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.
पोलिस तपास सुरू
गंगापूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फरार कंटेनरचा शोध सुरू आहे.