हल्ली अगदी लहान वयातच मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. वाढलेला स्क्रीन टाइम, मोबाईलचा वापर, चुकीच्या सवयी आणि अभ्यासाचा ताण यामुळे अनेक मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या लवकर दिसून येतात. मात्र, अनेकदा मुलांना स्वतःला नीट दिसत नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे पालकांनीच काही लक्षणांकडे लक्ष देणं गरजेचं ठरतं. म्हणूनच मुलांच्या वागण्यात किंवा सवयींमध्ये दिसणारे छोटे बदल दुर्लक्षित न करता वेळीच डोळ्यांची तपासणी करणं आवश्यक आहे. (kids eye care signs of weak eyesight in children)
मुलांना चष्म्याची गरज का भासते?
प्रत्येकवेळी फक्त कमी दिसतं म्हणूनच मुलांना चष्मा लागतो असं नाही. काही मुलांमध्ये डोळ्यांचा ताण, तिरळेपणा, आळशी डोळा (Lazy Eye) किंवा डोळ्यांच्या स्नायूंमधील असंतुलन यामुळेही चष्म्याची गरज भासू शकते. योग्य वेळी उपचार मिळाल्यास भविष्यातील मोठ्या समस्या टाळता येऊ शकतात.
1) टीव्ही किंवा पुस्तक खूप जवळून पाहणे
जर मूल सतत टीव्हीजवळ बसत असेल किंवा पुस्तक चेहऱ्याच्या अगदी जवळ धरून वाचत असेल, तर ते निकटदृष्टी (Myopia) चे लक्षण असू शकते. दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नसल्यामुळे मूल नकळत जवळ जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतं.
2) डोळे बारीक करून पाहणे
लांबचं स्पष्ट दिसावं म्हणून काही मुलं वारंवार डोळे बारीक करून पाहतात. हे दृष्टीवर ताण येत असल्याचं संकेत असू शकतं. विशेषतः टीव्ही पाहताना किंवा शाळेत फळ्याकडे पाहताना अशी सवय दिसल्यास वेळीच तपासणी करणं गरजेचं आहे.
3) वारंवार डोळे चोळणे किंवा पाणी येणे
मूल सतत डोळे चोळत असेल, तर त्यामागे डोळ्यांचा थकवा किंवा आय स्ट्रेन कारणीभूत असू शकतो. काही वेळा डोळे लाल होणे किंवा विनाकारण पाणी येणेही दृष्टीदोषाचे संकेत असू शकतात.
4) मान तिरकी करून पाहणे
काही मुलं वस्तू नीट दिसण्यासाठी वारंवार मान एका बाजूला झुकवतात किंवा डोकं तिरकं करून पाहतात. हे डोळ्यांच्या स्नायूंमधील असंतुलन किंवा तिरळेपणाचं लक्षण असू शकतं.
5) अभ्यासावरही होतो परिणाम
दृष्टी नीट नसल्यामुळे मुलांना फळ्यावरचं दिसत नाही किंवा वाचन करताना त्रास होतो. त्यामुळे अभ्यासात लक्ष न लागणे, वाचताना शब्द गाळणे किंवा ओळी चुकवणे अशा समस्या दिसू शकतात. काही मुलं बोट ठेवून वाचतात किंवा पटकन अभ्यासाचा कंटाळा करतात.
6) डोकेदुखी आणि प्रकाशाचा त्रास
शाळेतून आल्यावर वारंवार डोकेदुखी होणे, उजेडात डोळे उघडताना त्रास होणे किंवा प्रकाश सहन न होणे ही देखील कमकुवत दृष्टीची लक्षणं असू शकतात. अशावेळी डोळ्यांवर ताण येत असल्याची शक्यता असते.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
– मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित ठेवा.
– मोबाईल किंवा टीव्ही योग्य अंतरावरून पाहण्याची सवय लावा.
– बाहेर खेळण्यासाठी प्रोत्साहन द्या.
– वर्षातून किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या.
– संतुलित आहारात गाजर, हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.