मुंबई : लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ (Annabhau sathe) साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉ. शांताबाई साठे (दोडके) यांचे 4 मे रोजी दुपारी 5 वाजता कांदिवली (Mumbai) येथील एका खासगी रुग्णालयात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने अण्णा भाऊंच्या विचारांचा वारसा जपणारा एक स्वाभिमानी दुवा हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात लहान बहीण शकुंतला, भाचे, भाची आणि नातवंडे असा परिवार आहे.
कॉ. शांताबाई या अण्णा भाऊंच्या पत्नी कॉ. जयवंताबाई यांच्या कन्या होत्या. बालपणापासूनच त्यांच्यावर कम्युनिस्ट पक्षाचे संस्कार झाले. त्यांनी 'बाल संघाचे' आणि तत्कालीन 'लाल बावटा कला पथकाचे' कार्य केले. त्याकाळी त्यांनी कॉ. डांगे यांची मुलगी रोझा देशपांडे, कॉ. आर. बी. मोरे यांची मुले सत्येंद्र व कमल, माजी महापौर कॉ. मिरजकर यांचा मुलगा प्रभाकर आणि कॉ. सुमन मोकाशी यांच्यासोबत सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.
तुरुंगवास आणि कामगार चळवळ
1949 च्या काळात जेव्हा कम्युनिस्ट पक्षावर दडपशाही सुरू होती, तेव्हा शांताबाईंनी काही महिने तुरुंगवासही भोगला. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी त्यांनी औषध कंपनीत नोकरी पत्करली. नोकरी सांभाळून त्या पक्षाच्या कामगार संघटनेचे काम पाहत असत.
माणुसकी आणि कौटुंबिक जिव्हाळा
शांताबाईंचे व्यक्तिमत्व अत्यंत हळवे आणि प्रेमळ होते. स्वतःच्या तुटपुंज्या पगारातून त्या दरमहा वाटेगावला अण्णा भाऊंच्या पहिल्या पत्नीला (कोंडाबाई) आर्थिक मदत पाठवत असत. अण्णा भाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषतः मुलगा मधुकर यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते.
साहित्य आणि रंगभूमीवरील योगदान
अण्णा भाऊंच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांच्या त्या पहिल्या वाचक असत.
* शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
* 70 च्या दशकात 'काई चालं न गा' या लोकनाट्यात त्यांनी भूमिका केली.
* 1986 साली 'लोकमंच' संस्थेच्या 'अकलेची गोष्ट' या गाजलेल्या लोकनाट्यात दिग्दर्शन सहाय्य आणि अभिनय केला.
अखेरपर्यंत स्वाभिमान जपला
उतारवयात कलाकार पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला, मात्र त्यांनी कधीही आपली तत्त्वे सोडली नाहीत. शासनाकडे त्यांनी कधीही 'जी हुजुरी' केली नाही. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या या कन्येला समाजाने जो मानसन्मान द्यायला हवा होता, तो मिळाला नाही, याची खंत त्यांना अखेरपर्यंत होती. तरीही त्यांनी आपला स्वाभिमान आणि कष्टकरी चळवळीशी असलेली बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जपली.