शिक्रापूर, ता. १० : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे शेतीच्या वादातून आणि जुन्या तक्रारीच्या रागातून एका दाम्पत्याला दगड व काठीने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दत्तात्रय संदीपान पवार, आशा दत्तात्रय पवार, आयुष दत्तात्रय पवार व गणेश दत्तात्रय पवार (सर्व रा. जातेगाव बुद्रुक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संतोष संदीपान पवार (वय ४५) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष आणि दत्तात्रय या भावांमध्ये जमिनीचा जुना वाद आहे. संतोष शेतातून घरी परतत असताना आरोपींनी त्यांना अडवून शिवीगाळ करत मारहाण केली. पतीला वाचवण्यासाठी आलेल्या अश्विनी पवार यांनाही आरोपींनी जखमी केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे करत आहेत.