CM विजय यांच्यापेक्षाही या महिलेची चर्चा, थलपतींच्या मंत्रिमंडळात येताच मोडले दोन विक्रम; जाणून व्हाल थक्क
Tv9 Marathi May 10, 2026 05:45 PM

तमिळनाडूमध्ये ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) प्रमुख विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच राज्याच्या राजकारणात एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. या नव्या प्रवासात विजय यांच्या कोअर टीमची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. विजय यांच्यासोबतच इतर ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली, ज्यामध्ये शिवकाशीच्या आमदार एस. कीर्तना यांचा समावेश आहे. कीर्तना यांचे वय अवघे २९ वर्षे असून त्या तमिळनाडूच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत.

29व्या वर्षी मंत्रिपदाची जबाबदारी

फटाक्यांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिवकाशी मतदारसंघातून कीर्तना यांनी ११ हजार मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. आता त्या विजय यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण चेहरा म्हणून शपथबद्ध झाल्या आहेत. एस. कीर्तना (पूर्ण नाव: कीर्तन संपत) यांना अनेक भाषांचे ज्ञान आहे. विशेष म्हणजे, त्या अत्यंत चांगल्या प्रकारे हिंदी बोलू शकतात. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांच्या अनेक मुलाखती समोर आल्या, ज्यामध्ये त्यांनी हिंदीतून संवाद साधला होता. तमिळनाडूमध्ये जिथे हिंदीला विरोध केला जातो, तिथे एखाद्या सार्वजनिक नेत्याने इतक्या अस्खलितपणे हिंदीत बोलणे ही मोठी गोष्ट मानली जाते.

राजकीय सल्लागार ते मंत्री असा प्रवास

शिक्षण: कीर्तना यांनी पदव्युत्तर (PG) शिक्षण पूर्ण केले आहे.

अनुभव: राजकारणात येण्यापूर्वी त्या ‘पॉलिटिकल कन्सल्टंट’ (राजकीय सल्लागार) म्हणून काम करत होत्या.

कोणासोबत काम केले: त्यांनी यापूर्वी डीएमके नेते एम.के. स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत कामाचा अनुभव घेतला आहे.

७० वर्षांचा रेकॉर्ड मोडला

कीर्तना यांनी यंदाच्या निवडणुकीत ७० वर्षांचा इतिहास बदलला आहे. त्या शिवकाशी मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत. या जागेवर गेल्या ७ दशकांपासून केवळ पुरुष नेत्यांचेच वर्चस्व होते, जे कीर्तना यांनी मोडून काढले आहे.

हिंदी भाषेबद्दलचा दृष्टिकोन

भाषावादाच्या वादातही कीर्तना कोणत्याही संकोचाशिवाय हिंदी बोलतात. त्यांच्या मते, राष्ट्रीय स्तरावर स्वतःला जोडण्यासाठी हिंदी ही आवश्यक भाषा आहे. टीव्हीके पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी पक्षाच्या नेत्याने हिंदीत संवाद साधणे गरजेचे असल्याचेही त्या मानतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.