Chennai Super Kings vs Lucknow Super Giants Marathi Cricket Update: चेन्नई सुपर किंग्सच्या उर्विल पटेलने ( Urvil Patel) चेपॉकचे मैदान दणाणून सोडले. त्याने ८ षटकार व २ चौकारांसह २३ चेंडूंत ६५ धावांची विक्रमी खेळई करताना लखनौ सुपर जायंट्सला गुडघे टेकण्यास भाग पाडले. चेन्नईने या विजयासह IPL 2026 Point Table मध्ये आगेकूच केली आणि LSGला स्पर्धेबाहेर फेकले. CSK १२ गुणांसह पाचव्या क्रमांकावर सरकले आहेत आणि त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकले आहे. तेच LSG चा हा ११ सामन्यांतील ८वा पराभव ठरला आणि त्यांचे प्ले ऑफचे स्वप्न धुळीस मिळाले.
CSK ला २०१९ नंतर एकदाही १८० किंवा त्यापेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करता आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर २०४ धावांचा पाठलाग करताना दडपण दिसेल, असा अंदाज होता. पण, संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाड यांनी ३.४ षटकांत ४५ धावा चढवून LSG वरच दडपण निर्माण केले. द्विग्वेश राठीने संजूला ( २८) बाद केल्यानंतर उर्विल पटेलचे वादळ घोंगावले. त्याने त्याच्या पहिल्या ८ चेंडूंत ६ षटकार हाणले आणि आयपीएल इतिहासात असा पराक्रम करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली. त्याने १३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि यशस्वी जैस्वालसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी बसला.
१३ चेंडू - यशस्वी जैस्वाल ( RR vs KKR, 2023)
१३ चेंडू - उर्विल पटेल ( CSK vs LSG, 2026)
१४ चेंडू - लोकेश राहुल ( PBKS vs DC, 2018)
१४ चेंडू - पॅट कमिन्स ( KKR vs MI, 2022)
१४ चेंडू - रोमारिओ शेफर्ड ( RCB vs CSK, 2025)
आयपीएल इतिहासात डावातील पहिल्या १० चेंडूंत सर्वाधिक ४२ धावांचा विक्रमही उर्विलने आज नावावर केला. त्याने एबी डिव्हिलियर्सचा नाबाद ४१ धावांचा ( vs MI, 2015) विक्रम मोडला. उर्विलच्या खेळीला १०व्या षटकात शाहबाज अहमदने ब्रेक लावला. उर्विल २३ चेंडूंत २ चौकार व ८ षटकारांसह ६५ धावांवर झेलबाद झाला. त्याने ऋतुराजसह ३४ चेंडूंत ८१ धावा जोडल्या आणि त्यात ऋतुच्या फक्त १५ धावा होत्या. चेन्नईने १० षटकांत २ बाद १३२ धावा फलकावर चढवल्या आणि ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्ध वानखेडेवर २ बाद १२८ धावा केल्या होत्या.
त्यानंतर कर्णधार ऋतुराज यालाही शाहबाजने बाद केले. ऋतुराज २८ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ४२ धावांवर माघारी परतल्याने चेन्नईवर दडपण वाढले. कार्तिक शर्मा व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांच्याकडून अपेक्षा होत्या, परंतु दोन चेंडूंच्या फरकाने दोघं बाद झाले. ब्रेव्हिसने १०, तर कार्तिकने २० धावा केल्या. दिग्वेश व आवेश यांनी या विकेट्स मिळवून दिल्या. चेन्नईला अजूनही २३ चेंडूंत ३५ धावा हव्या होत्या आणि शिवम दुबेवर आता सर्व भीस्त होती. खेळपट्टी संथ झाल्याने गोलंदाजांना मदत मिळताना दिसली.
आवेशने १७व्या षटकात केवळ ५ धावा दिल्याने चेन्नईला १८ चेंडूंत ३० धावा करायच्या होत्या. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या प्रशांत वीरने षटकार खेचला खरा, परंतु प्रिंस यादवच्या १८व्या षटकात ९ धावाच आल्या. त्यामूळे १२ चेंडू २१ धावा, असा चेन्नई अजूनही विजयापासून दूर होता. १८व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर प्रशांचा झेल दिग्वेशने टाकला. पुढच्या चेंडूवर निकोलस पूरनने झेल टाकला. मिळालेल्या संधीचा फायदा उचलताना प्रशांतने आणखी एक षटकार मारला आणि ११ धावा मिळवल्या. शेवटच्या षटकात चेन्नईला आणखी १० धावा हव्या होत्या. दोन्ही डावखुरे फलंदाज असल्याने एडन मार्करमला २०वे षटक दिले गेले आणि त्याने पहिले दोन चेंडू व्हाईड टाकले. शिवमने सलग दोन षटकार खेचून चेन्नईला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, लखनौला आक्रमक सुरुवातीनंतरही ८ बाद २०३ धावांपर्यंत पोहोचता आले. जॉश इंग्लिसने ३३ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली, परंतु मधल्या फळीने निराश केले. शाहबाज २५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४३ धावांवर नाबाद राहिला आणि त्याने हिंमत सिंगसोबत ५० धावांची भागीदारी करून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जेमी ओव्हर्टनने ३, तर अंशुल कंबोजने दोन विकेट्स घेतल्या.