खरात प्रकरणात एसआयटीने नेमके कोणते प्रश्न विचारले? चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया
Tv9 Marathi May 10, 2026 11:45 PM

अशोक खरात प्रकरणात आज एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली? रुपाली चाकणकरांची एसआयटी चौकशी आता संपलेली आहे. खरातसोबतच्या आर्थिक आणि संस्थात्मक संबंधांसदर्भात एसआयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. समोर आलेल्या माहितीनुसार साधारणपणे साडेपाच तास एसआयटीकडून त्यांची चौकशी करण्यात आली. आपण एसआयटीच्या चौकशीला समर्पक अशी उत्तरं दिल्याची माहिती या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

नेमकं काय म्हणाल्या चाकणकर? 

त्यांचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे सर्वांचं समाधान झालं असेल, असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी तुम्ही पुन्हा चौकशीला येणार आहात का? तुम्हाला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे का? असा प्रश्नही यावेळी चाकणकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर मात्र त्यांनी बोलणं टाळलं आहे. पोलिसांना या प्रकरणातील तपासामध्ये माझं जसं सहकार्य हवं असेल तसं मी सहकार्य करेल असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी चाकणकर यांना पत्रकारांनी असाही प्रश्न विचारला की या प्रकरणात तुम्हाला नक्की काय-काय प्रश्न विचारण्यात आले. यावर उत्तर देताना ते तुम्हाला अहवाल आल्यावर समजेलच असं यावेळी रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. एक वाजता एसआयटी चौकशीला सुरुवात झाली, चार तासांची चौकशी झाली अशी माहिती देखील यावेळी रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अंदाजे साडेपाच तास एसआयटीकडून रुपाली चाकणकर यांची चौकशी करण्यात आली. ज्यामध्ये तुम्ही अशोक खरातला कधीपासून ओळखता? शिवणीका संस्थांवर असताना या सगळ्या खरात प्रकरणाची तुम्हाला माहिती होती का?  अशोक खरात सोबत ज्या पूजा विधी केल्या त्या नेमक्या कोणत्या होत्या? खरातसोबत काही आर्थिक संबंध होते का? अशोक खरात सोबत काढलेले फोटो व्हिडिओ नेमके केव्हाचे आहेत आणि कोणत्या कार्यक्रमातील आहेत? शिवनीका संस्थांच्या बैठकांमधून कोणते कामकाज सुरू होते? असे काही प्रश्न चाकणकर यांना यावेळी विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी रुपाली चाकणकर यांची चौकशी केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.