Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी
esakal May 12, 2026 11:45 PM

Sangli Jat Motevadi Wall Collapse : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मोटेवाडी गावात जत्रेदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भिंत कोसळून ५ ते ६ भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेत १० ते १२ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोटेवाडी येथे मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त मोठ्या (Margubai Devi Yatra) संख्येने भाविक उपस्थित होते. दरम्यान, अचानक वादळी वारा आणि पावसाला सुरुवात झाल्याने भाविकांनी जवळच सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी आसरा घेतला.

Pune Nasrapur Case : नसरापूर अत्याचार प्रकरण : चिमुरडीच्या शरीरावर गंभीर जखमा, आरोपीची तपासात उडवाउडवीची उत्तरे; पोलिसांचा न्यायालयात मोठा खुलासा

यावेळी जोरदार वाऱ्यामुळे पत्र्याचे शेड उडून ते चिरा-विटांच्या कच्च्या बांधकामावर आदळले. त्यामुळे कमकुवत अवस्थेतील भिंत अचानक कोसळली आणि तिच्या ढिगाऱ्याखाली अनेक भाविक दबले गेले. या दुर्घटनेत काही जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.