Police Recruitment : रिक्षावाल्या काकांच्या कन्येची पुणे शहर पोलिस दलात निवड
esakal May 13, 2026 03:45 AM

वाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर) येथील हनुमानवस्तीतील आचल लक्ष्मण पवार हिची प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुणे शहर पोलिस दलात निवड झाली आहे. मैदानी आणि लेखी परीक्षेत एकूण १३१ गुण मिळवून तिने हे यश संपादन केले.

आचलचे वडील लक्ष्मण पवार पुणे परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही आचलने जिद्दीने शिक्षण आणि पोलिस भरतीची तयारी सुरू ठेवली होती. तिने मैदानी चाचणीत ४३ आणि लेखी परीक्षेत ८८ गुण मिळवले. आचल ही राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू असून तिने द्रोणा स्पोर्ट्स क्लबकडून खेळताना आपली ओळख निर्माण केली आहे.

तिने आपले प्राथमिक शिक्षण भावे शाळा, माध्यमिक शिक्षण रेणुका स्वरूप प्रशाला आणि पदवी शिक्षण एस. पी. कॉलेजमधून पूर्ण केले. आचलच्या या यशामुळे वाल्हे परिसरात तिचे कौतुक होत असून, ग्रामीण भागातील मुलींसमोर तिने एक नवा आदर्श ठेवला आहे. तिच्या या यशात आई स्वाती पवार आणि वडिलांचे मोठे प्रोत्साहन लाभले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.