महाळुंगे पडवळ - ‘शिक्षणाला वयाचे बंधन नसते’ हे चास (ता. आंबेगाव) येथील ६५ वर्षीय माणिक राजाराम रायकर यांनी सिद्ध केले आहे. घरगुती जबाबदाऱ्या सांभाळून त्यांनी वयाच्या या टप्प्यावर दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले.
माणिक रायकर यांचे १९७८ मध्ये लग्न झाल्याने त्यांचे शिक्षण सातवीतच सुटले होते. त्यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून त्यांची लग्नेही झाली आहेत. मात्र, अर्धवट राहिलेल्या शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कुटुंबाच्या पाठिंब्याने त्यांनी २०२४ मध्ये मुंबईतील भांडूप येथील एका रात्रशाळेत आठवीत प्रवेश घेतला. दिवसा घरकाम आणि संध्याकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत शाळा असा प्रवास करत त्यांनी यंदा नातवंडांच्या वयात दहावीची परीक्षा दिली होती.
या यशाबद्दल पुणे जिल्हा परिषद सदस्या प्रीती थोरात पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण थोरात पाटील व ग्रामस्थांनी रायकर यांचा सत्कार केला. ‘इच्छाशक्ती प्रबळ असेल तर वय आड येत नाही. संसार सांभाळून त्यांनी पूर्ण केलेले स्वप्न इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे,’ अशा शब्दांत प्रीती थोरात पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.