Leopard Captured : हिवरे कुंभारला एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे जेरबंद
esakal May 13, 2026 03:45 AM

शिक्रापूर - शिरूर तालुक्यात बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेऊन वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी दोन बिबटे जेरबंद झाल्याची दुर्मिळ घटना हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथे नुकतीच घडली. पकडण्यात आलेल्या दोन्ही बिबट्यांची वनविभागाने माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी केली.

हिवरे कुंभार व पिंपळे खालसा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मोठा वावर दिसून येत होता. काही पाळीव प्राण्यांवरही त्यांचे हल्ले सर्रास झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे वनविभागाने या गावांच्या हद्दीत चार दिवसांपूर्वी स्वप्नील धुमाळ यांच्या घराजवळ पिंजरा लावला होता.

पिंजरा लावल्यानंतर दोन दिवसांनी सकाळच्या सुमारास या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांना मिळाली. त्यानंतर नियतक्षेत्र वनअधिकारी सोपान अनासुने, वन्यजीव बचाव पथकातील शेरखान शेख, गणेश टिळेकर, अमोल कुसाळकर व परमेश्वर दासरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी एकाच पिंजऱ्यात दोन बिबटे अडकल्याचे दिसून आले.

वनविभागाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत दोन्ही बिबट्यांना सुरक्षित ताब्यात घेतले. वन विभागाचे वतीने दोन्ही बिबट्यांची सुरक्षितपणे माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवानगी केली.मादी बिबट्या व तिचा बछडा एकाच वेळी पिंजऱ्यात गेल्याने ही घटना घडली असावी. शिरूर तालुक्यात प्रथमच अशा प्रकारची घटना घडल्याची माहिती नियतक्षेत्र वनअधिकारी अनासुने यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.