पारनेर : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारादरम्यान सहा वर्षीय प्रियांशी बागडे या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी केली आहे.
सुपे ( ता. पारनेर )येथील रहिवासी असलेल्या प्रियांशी बागडे हिला डोळ्यात तिरळेपणाचा त्रास असल्याने शस्त्रक्रियेसाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालय प्रशासनाने सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या व अहवाल सामान्य असल्याचे सांगितल्यानंतर पालकांनी डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचारास संमती दिली होती.
मात्र शस्त्रक्रियेपूर्वी ऑपरेशन थिएटरमध्ये डोळ्यांत औषधी ड्रॉप टाकल्यानंतर प्रियांशीची प्रकृती अचानक गंभीररीत्या बिघडली. तिला रक्ताच्या उलट्या सुरू झाल्यानंतर तातडीने आयसीयूमध्ये हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पालकांना योग्य माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
खासदार लंके यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. सर्व अहवाल सामान्य असताना अशी गंभीर दीनानाथ रुग्णालयातील चिमुरडीच्या मृत्यूप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी खासदार नीलेश लंके केली आहे.
एका निष्पाप चिमुरडीचा जीव गेला आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सरकार आणि आरोग्य विभागाने तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषी आढळणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी किंवा रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करावी-नीलेश लंके, खासदार.