उच्च न्यायालयाचा आदेश : 25 जूनपर्यंत अहवाल सादर करावा लागणार
वृत्तसंस्था/कोलकाता
कलकत्ता उच्च न्यायालयाने आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयात घडलेल्या बलात्कार-हत्याप्रकरणातील आरोप दडपण्यात आल्याच्या दाव्याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला आहे. न्यायालयाने सीबीआयला एक एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला. या एसआयटीचे नेतृत्व सीबीआयचे पूर्व क्षेत्रासाठीचे संयुक्त संचाल करतील. एसआयटीला 25 जूनपर्यंत अहवाल सादर करावा लागणार आहे. पीडितेच्या आईवडिलांकडून दाखल याचिकेवर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. मागील वर्षी 17 मार्च रोजी पीडितेच्या पालकांनी सीबीआयवर प्रकरणाचा योग्य तपास न करणे आणि सत्य दडपल्याचा आरोप केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी पीडितेच्या पालकांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची अनुमती दिली होती. आरजी कर रुग्णालयात 8 ऑगस्ट 2024 च्या रात्री प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. 9 ऑगस्ट रोजी सकाळी तिचा मृतदेह सेमिनार हॉलमध्ये मिळाला होता. तर याप्रकरणी 20 जानेवारी 2025 रोजी सत्र न्यायालयाने आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. परंतु पीडितेचे आईवडिल या चौकशीबद्दल समाधानी नव्हते. त्यांनी मुख्य गुन्हेगार संजय रॉयसोबत अन्य आरोपी गुन्ह्यात सामील असल्याचा आरोप करत विस्तृत चौकशीची मागणी केली होती.