ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासोबतच दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हिंदी चित्रपटसृष्टीबरोबरच तिने दक्षिण भारतीय सिनेमातही उल्लेखनीय काम केले आहे. जवळपास तीन दशकांच्या कारकिर्दीत तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले असून अभिनयावरील तिची निष्ठा आणि मेहनत याबद्दल नेहमीच चर्चा होत असते.
अशाच एका प्रसंगामुळे तिचे कामाप्रती असलेले समर्पण पुन्हा एकदा अधोरेखित झाले होते. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देवदास’ या चित्रपटात ऐश्वर्या रायने ‘पारो’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात शाहरुख आणि माधुरी यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.
या चित्रपटातील ‘डोला रे डोला’ हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक मानले जाते. या गाण्यात माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या नृत्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. मात्र या गाण्याच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या रायला गंभीर त्रास सहन करावा लागला होता.
चित्रपटातील पारंपरिक लूकसाठी ऐश्वर्या रायने अतिशय जड दागिने आणि मोठे झुमके परिधान केले होते. सलग अनेक तास शूटिंग सुरू असल्याने त्या झुमक्यांचा कानांवर मोठा ताण पडला. परिणामी तिच्या कानाला जखम झाली आणि रक्तस्राव सुरू झाला. विशेष म्हणजे, एवढ्या वेदना होत असूनही तिने शूटिंग थांबवले नाही.