डोनाल्ड ट्रम्प यांना स्वत:च्या देशात मोठा धक्का, अमेरिकेत खळबळ; इंटेलिजन्स डायरेक्टर…
Tv9 Marathi May 23, 2026 11:45 AM

इराण वि. अमेरिका-इस्रायलच्या युद्धसंघर्षाचा अद्याप निकाल लागलेला नाहीये. यावरून जगात अजूनही तणाव आहे, त्यातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना त्यांच्याच देशात मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या (इंटेलिज्नस) संचालक तुलसी गबार्ड यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाचा भाग होत्या आणि त्यांची राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  मात्र त्यांच्या पतीच्या प्रकृतीमुळे गबार्ड यांनी हा निर्णय घेतला.

हाडांच्या कर्करोगाच्या एका अत्यंत दुर्मिळ प्रकाराशी लढणाऱ्या पतीला पाठिंबा देण्यासाठी आपण राजीनामा दिला आहे, असं तुलसी गबार्ड यांनी आपल्या राजीनाम्यात लिहील्याचं वृत्त फॉक्स न्यूज एजन्सीने दिलंय.

“तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे आणि गेल्या दीड वर्षांपासून राष्ट्रीय गुप्तचर संचालक कार्यालयाचे नेतृत्व करण्याची जी संधी दिली आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे.” असं म्हणत तुलसी गबार्ड यांनी पत्रातून ट्रम्प यांचे आभार मानलेत.

पतीची तब्येत खराब

तुळसी गबार्ड यांनी गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून शपथ घेतली होती. मात्र आता त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. “दुर्दैवाने, मला 30 जून 2026 पासून राजीनामा द्यावा लागत आहे. माझे पती, अब्राहम, यांना नुकतेच हाडांच्या कर्करोगाचा एक अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याचे निदान झाले आहे.” असं गबार्ड यांनी म्हटलंय.

US Director of National Intelligence Tulsi Gabbard tenders resignation, citing the health of her husband, Abraham, who has been diagnosed with an extremely rare form of bone cancer

She tweets, “…I must submit my resignation, effective June 30, 2026. My husband, Abraham, has… https://t.co/yEUvuiXiWi pic.twitter.com/u8vdwjWsLc

— ANI (@ANI)

येत्या काही आठवड्यांत माझ्या पतीला मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. या काळात मी सार्वजनिक सेवेतून बाजूला होऊन त्यांच्यासोबत राहणे आणि कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात त्यांना पाठिंबा देणं, अत्यंत महत्त्वाचं आहे, असं त्यांनी नमूद केलं. “आमच्या लग्नाला ११ वर्षे झाली आहेत. अब्राहम माझ्यासाठी शक्तीचा आधारस्तंभ राहिला आहे.” असंही त्यांनी म्हटलं.

प्रत्येक आव्हानात त्यांनी दिला पाठिंबा

पूर्व आफ्रिकेतील संयुक्त विशेष कृती मोहिमेवरील स्पेशल ऑपरेशनदरम्यान आणि अनेक राजकीय प्रचार मोहिमांमधील माझ्या भूमिकेदरम्यान ते (त्यांचे पती) माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या सामर्थ्याने आणि प्रेमाने मला प्रत्येक आव्हानात आधार दिला आहे, असे तुलसी गबार्ड म्हणाल्या.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.