एव्हरेस्ट शिखरावर विक्रमी चढाई केली, पण उतरताना आक्रीत घडलं; दोन भारतीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी अंत
जयदीप मेढे May 23, 2026 02:43 PM

Mount Everest: जगातील सर्वोच्च शिखर (Highest Peak) असलेल्या माऊंट एव्हरेस्टवरून (Mount Everest) यशस्वी चढाई करून खाली उतरताना दोन भारतीय गिर्यारोहकांचा (Indian Climbers) दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरुण कुमार तिवारी (Arun Kumar Tiwari) आणि संदीप आरे (Sandeep Aare) अशी या मृत गिर्यारोहकांची नावे आहेत. एव्हरेस्ट शिखर सर केल्यानंतर खाली उतरत असताना अचानक या दोघांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांचा अंत झाला.

शेर्पा मार्गदर्शकांनी या दोन्ही गिर्यारोहकांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र दुर्दैवाने त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे यंदाच्या गिर्यारोहण हंगामात (Mountaineering Season) एव्हरेस्टवर मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या आता पाचवर पोहोचली आहे. यापूर्वी, तीन नेपाळी गिर्यारोहकांचा येथे मृत्यू झाला होता. संदीप आरे यांनी बुधवारी तर अरुण तिवारी यांनी गुरुवारी एव्हरेस्टवर यशस्वी चढाई केली होती, अशी माहिती 'नेपाळ एक्स्पिडिशन ऑपरेटर्स असोसिएशन'चे (Nepal Expedition Operators Association) ऋषी भंडारी यांनी दिली.

Mount Everest: एकाच दिवशी विक्रमी चढाई, पण...

बुधवारी संदीप आरे यांच्यासह तीन भारतीय आणि एकूण 274 गिर्यारोहकांनी 8,848.86 मीटर उंचीचे एव्हरेस्ट शिखर सर केले होते. एव्हरेस्टच्या इतिहासातील एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्रमी चढाई (Record Climb) मानली जात आहे. या ऐतिहासिक मोहिमेत (Expedition) संदीप आरे यांच्यासोबत तुलसी रेड्डी पालपुनुरी आणि अजय पाल सिंह धालीवाल हे भारतीय गिर्यारोहकही सहभागी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी शिखर सर करून खाली उतरत असताना अरुण कुमार तिवारी यांची प्रकृती 'हिलरी स्टेप' (Hillary Step) जवळ अचानक बिघडली. यावेळी चार शेर्पा गिर्यारोहकांनी तातडीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे त्यांना वाचवता आले नाही.

दुसरीकडे, संदीप आरे यांनी बुधवारीच शिखर सर केले होते. परंतु, खाली उतरताना त्यांची प्रकृती वेगाने खालावू लागली. शेर्पा मार्गदर्शकांनी त्यांना 'साउथ समिट'वरून (South Summit) अतिशय शिताफीने व सुखरूपपणे खाली आणले; मात्र, शुक्रवारी पहाटे 'कॅम्प-२' (Camp-2) वर पोहोचल्यानंतर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली. सध्या दोन्ही मृत गिर्यारोहकांचे मृतदेह (Bodies) पुढील प्रक्रियेसाठी काठमांडू येथे आणण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Crime News: नाशिकमध्ये मध्यस्थी करायला गेलेल्या मेहुणीचा घेतला जीव, कल्याणमध्ये आईला दवाखान्यातून सोडताच तरुणाला अज्ञाताने संपवलं; राज्यात दोन खळबळजनक घटना

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.