पुण्याच्या सदाशिव पेठेत वास्तव्य, दोन्ही लेकरं परदेशात, शाळेत शिकवणारी साधी शिक्षिका नीट पेपरफुटीची मास्टरमाईंड कशी झाली? वाचा मनीषा हवालदारांची इनसाईड स्टोरी
मिकी घई, एबीपी माझा, पुणे May 23, 2026 03:13 PM

पुणे : देशभरात खळबळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीप्रकरणी तपासान सीबीआयने अनेकांची चौकशी केली (NEET Exam Leake) असून पेपरफुटीत महत्त्वाची भूमिका असलेल्या शिक्षकांना देखील अटक केली आहे. मनिषा वाघमारे, मनिषा मांढरे, पी.व्ही. कुलकर्णी, शिवराज मोटेगावकर यांच्यानतर आता केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी मनिषा हवालदार यांना ताब्यात घेतलं.  शेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा संजय हवालदार (रा. सदाशिव पेठ) हिला अटक केली असून, त्यांची राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (एनटीए) भौतिकशास्त्र विषयाच्या तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दोन मनीषांना अटक करण्यात आली होती; या अटकेनंतर 'मनीषा' नावाच्या त्या तिसऱ्या आरोपी समोर आल्या आहेत. तर या कारवाईनंतर हिरालाल सराफ विद्यालयचे सचिव सतीश भालचंद्र गवळी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.(NEET Exam Leake)

NEET Exam Leak : मनीषा हवालदार 1992 पासून या शाळेमध्ये काम करतात

त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, मनीषा हवालदार 1992 पासून या शाळेमध्ये काम करतात. सध्या त्या शाळेच्या मुख्याध्यापिका होत्या. नीट पेपर फुटी प्रकरणी त्यांना अटक झाली हे आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं. मनीषा हवालदार या NTA वर होत्या, हे आम्हाला कधी माहीतच नव्हतं, त्यांनी सांगितलं देखील नाही. संस्थेकडून सध्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. सीबीआयची टीम काल आमच्या शाळेमध्ये आली होती. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज, मनीषा हवालदार जो कम्प्यूटर वापरायचे त्याचे हार्ड डिस्क तसेच काही कागदपत्र देखील घेऊन गेले आहेत. या प्रकरणामुळे आमच्या शाळेचे नाव खूप बदनाम झालं आहे. मुख्याध्यापिका मनीषा हवालदार हे असं करतील हे आम्हाला कधी वाटलं नव्हतं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Pune NEET Exam Leak : दोन्ही मुलांचे शिक्षण विदेशात सुरू 

नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदार या पुण्यातील सदाशिव पेठेतील लक्ष्मी निवास सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. गेल्या 23 वर्षांपासून त्या या सोसायटीत राहत असून, त्यांच्या दोन्ही मुलांचे शिक्षण विदेशात सुरू आहे.
सीबीआयची टीम काल सकाळी साडेदहाच्या सुमारास या ठिकाणी दाखल झाली होती. जवळपास सात तास सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून फ्लॅटमध्ये तपास आणि चौकशी करण्यात आली. यावेळी काही महत्त्वाच्या वस्तू आणि कागदपत्रे सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मनीषा हवालदार यांना देखील सीबीआयने सोबत नेले आणि पुढे त्यांना अटक दाखवण्यात आली. सध्या मनीषा हवालदार या त्यांच्या पती आणि वडिलांसोबत या फ्लॅटमध्ये राहत होत्या.

NEET Exam Leak : महिनाभरावर होती सेवानिवृत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा हवालदार येत्या जून महिन्यात सेवानिवृत्त होणार होती. याचप्रमाणे मांढरे हिचेही सेवेचे शेवटचे काही महिने उरले होते. 'या दोन्ही मनीषा एकमेकांना ओळखत होत्या; तसेच त्यांच्या भेटीदेखील होत असत,' अशी माहिती एका मराठी वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

Pune NEET Exam Leak : मनीषा हवालदारला सीबीआयकडून अटक

मनीषा हवालदार सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सर्फ प्रशाला येथे कार्यरत होती. सीबीआयने तिला पुण्यातून अटक केली आहे. एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. तिच्याकडे भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकत होती. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून 3 मे रोजी नी यूजी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचं समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून आता परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडून करण्यात येत आहे. सीबीआयनं पेपरफुटीसंदर्भात चौकशी आणि अटकसत्र सुरु ठेवलं आहे. यात अकरावी अटक करण्यात आली आहे. ही अटक पुण्यातून करण्यात आली असून पुण्यातून मनीषा हवालदार या महिलेला अटक करण्यात आलं आहे.

या प्रकरणात सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे. तपासात प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोत समोर आला असून, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांनाही ओळखून अटक करण्यात आली आहे. NEET पेपर फुटी प्रकरणात CBI ने आतापर्यंत 11 लोकांना केली आहे अटक

Pune NEET Exam Leak : महाराष्ट्रातून कोणाकोणाला अटक 

मनीषा हवालदार - CBI 

शिवराज मोटेगावकर - CBI कोठडी

प्रल्हाद कुलकर्णी - CBI कोठडी

मनीषा मांढरे - CBI कोठडी

मनीषा वाघमारे - CBI कोठडी

शुभम खैरनार - CBI कोठडी

धनंजय लोखंडे - न्यायालयीन कोठडी

दुसऱ्या राज्यातून झालेली अटक :

दिनेश बिवाल - न्यायालयीन कोठडी

मांगीलाल बिवाल - न्यायालयीन कोठडी

विकास बिवाल - न्यायालयीन कोठडी

यश यादव - न्यायालयीन कोठडी

आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

NEET Exam Leak : मोटेगाकवरचे अंबाजोगाई कनेक्शन समोर

नीट प्रकरणातील मुख्य आरोपी शिवराज मोटेगाकवर याचे अंबाजोगाई कनेक्शन समोर आले आहेत. लातूर येथे कोचिंग क्लासेस सुरू करण्याच्या आधी 2003 पासून पुढील काही वर्ष अंबाजोगाईत मोटेगावकर खासगी क्लासेसला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या क्लासेसला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुढे त्याने अंबाजोगाईतील क्लासेस बंद करून लातूर येथे क्लासेस सुरू केले. आधीच विद्यार्थ्यांनी नीटचे पेपर घेतल्याप्रकरणी चौकशीनंतर CBI च्या रडारवर असलेले अंबाजोगाई पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.