मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोठा निधी खर्च करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (२५ मे) होणार आहे. मात्र या भूमिपूजन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर यांची नावेच नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांचया नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, उपमहापौर संजय घाडी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही.
पहिली पत्रिका

भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी उपस्थित राहणार असल्याचाही उल्लेख पाहायला मिळाला.
मात्र हा प्रकल्प थेट महानगरपालिकेच्या निधीतून राबवला जात असताना शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर तसेच उपमहापौर यांचा साधा उल्लेखही निमंत्रण पत्रिकेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेच्या निधीतून होणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या कार्यक्रमात महापौरांना आणि उपमहापौरांना डावलल्याची चर्चा आता पालिका आणि राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अखेर नवी पत्रिका जारी करण्यात आली त्यात केवळ महापौरांचा उल्लेख करण्यात आला तर उपमहापौरांचं नाव मात्र त्यामध्ये टाकण्यात आलं नाही.
सिद्धिविनायक मंदिर परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक व्यवस्थापन आणि भक्तांसाठी सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र भूमिपूजनाच्या आधीच निमंत्रण पत्रिकेवरून चर्चांना सुरुवात झाल्यानंतर महापौरांचं नाव वाढवण्यात आलं.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या नव्या पत्रिकेत मुंबई महापालिकेच्या महापौरांचे नाव समाविष्ट करण्यात आले असले, तरी उपमहापौर संजय घाडी यांचे नाव पुन्हा एकदा गायब असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर हे शिवसेना पक्षाचे असून उपमहापौर संजय घाडी हे देखील शिवसेनेचेच पदाधिकारी आहेत. त्यामुळे एकाच पक्षातील उपमहापौरांना वारंवार पत्रिकेतून वगळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उपमहापौरांचे नाव नसल्याने पालिका वर्तुळात नाराजीची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदारांनी काही दिवसांपूर्वी सिद्धिविनायक मंदिराला मुंबई महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या निधीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यशवंत किल्लेदार यांनी सभागृहात सिद्धिविनायक मंदिराला 500 कोटींच्या निधीची गरज का आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. सिद्धिविनायक मंदिर इतरांना कोट्यवधीच्या देणग्या देते, असा मुद्दा देखील त्यांनी उपस्थित केला होता.