मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, मध्यपूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून वारंवार इराणला धमकी देण्यात येत आहे. जर इराणने लवकरात लवकर अणुकरार केला नाही तर आम्ही पुन्हा इराणवर हल्ला करू, आमचं सैन्य तयार आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान इराणकडून पुन्हा एकदा अमेरिकेला युद्धबंदीसंदर्भात प्रस्ताव पाठवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावून लावला आहे. हा प्रस्ताव आम्हाला मान्य नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अणुकार्यक्रम हे आमचं प्राधान्य आहे, अणुकरार आणि युद्धविराम हे एकाचवेळी झाले पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं इराणचा नवा प्रस्ताव देखील फेटाळून लावल्यामुळे आता इराणवर पुन्हा एकदा अमेरिकेकडून हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
इराणने आपल्या प्रस्तावात काय म्हटलं होतं?
इराणने अमेरिकेला एक प्रस्ताव पाठवला होता, या प्रस्तावामध्ये इराणने काही अटी ठेवल्या होत्या, ज्यामध्ये त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मूज पुन्हा सुरू करण्याची तयारी देखील दर्शवली होती. अमेरिकेनं आम्हाला युद्धात जे नुकसान झालं आहे, त्याची नुकसान भरपाई द्यावी, अमेरिकेकडून इतर देशांमध्ये आमची जी संपत्ती जप्त करण्यात आली आहे, ती मुक्त करावी, तसेच अमेरिकेनं स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये जी नाकेबंदी केली आहे ती उठवावी अशी मागणी इराणने नव्या प्रस्तावात केली होती. परंतु इराणच्या नव्या प्रस्तावात कुठेही अणु कराराचा उल्लेख नव्हता, त्यामुळे अमेरिकेकडून इराणचा नवा प्रस्ताव देखील फेटळाण्यात आला आहे.
युद्धविराम आणि अणुकरार एकाचवेळी व्हावा अशी आमची भूमिका असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. अमेरिकेनं हे देखील स्पष्ट केलं आहे की जेव्हा तुम्ही अणु करार कराल तेव्हाच आम्ही तुमची जप्त केलेली संपत्ती देखील मुक्त करू, इराणने पाकिस्तानच्या माध्यमातून आपला नवा प्रस्ताव अमेरिकेपर्यंत पोहोचवला होता, मात्र अमेरिकेनं इराणचा नवा प्रस्ताव देखील फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटून आले आहेत.