सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे ती एलिमिनेटरच्या सामन्यात. बुधवारी महाराजा यादवेंद्र सिंग स्टेडियमवर हे दोन्ही संघ उतरतील ते ‘क्वालिफायर 2’ गाठण्यासाठी. कारण एलिमिनेटरमधील विजेत्याला पुढे चाल मिळणार आहे, तर जो संघ पराभूत होईल त्यांना आपला स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागणार आहे. त्यामुळे जो हा सामना जिंकेल तोच खरा बाजीगर ठरणार आहे.
या सामन्यात दोन युवा खेळाडूंवर सर्वांची नजर असणार आहे आणि ते दोघे म्हणजे वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा. आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये वैभवने दणकेबाज फटकेबाजी करत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे; पण आतापर्यंत त्याला शतक मात्र झळकवता आलेले नाही. वैभवने काही दिवसांपूर्वी ख्रिस गेलचा 175 धावांचा विक्रम मोडण्याची मनीषा बोलून दाखवली होती. त्यामुळे या सामन्यात तो किती धावा करतो याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.
अभिषेक शर्माला वैभवएवढी छाप यावेळी पाडता आलेली नाही. अभिषेकने दमदार फलंदाजी केली आहे. तो जेव्हा खेळतो तेव्हा तो एकहाती सामना जिंकवून देऊ शकतो, पण या हंगामात त्याला सातत्य ठेवता आलेले नाही. पण अभिषेक हा मोठय़ा सामन्याचे दडपण झुगारून कामगिरी करतो असे म्हटले जाते. त्यामुळे या सामन्यात त्याच्यावर साऱयांची नजर असणार आहे.
हैदराबादच्या संघातील अभिषेक शर्मासह ईशान किशन, हेन्रीच क्लासन आणि ट्रेव्हिस हेड या चौघांवर साऱयांच्या नजरा खिळलेल्या असतील. कारण हैदराबादचा संघ किती धावा करू शकतो हे या चौघांवर अवलंबून आहे. या चौघांपैकी दोघे जरी चमकले तरी संघाला 200च्या धावसंख्येपुढे घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे या चौघांवर सर्वांची नजर असेल.
जोफ्रा आर्चर हा ‘वन मॅन शो’ आहे आणि याची प्रचीती गेल्या सामन्यातही आली होती. आर्चर आतापर्यंत शांत होता, पण गेल्या सामन्यात त्याची अष्टपैलू कामगिरी सामना जिंकवू शकली. त्यामुळे आर्चर या सामन्यातही हैदराबादचा कर्दनकाळ ठरणार का हे पाहावे लागेल. खासकरून आर्चर हा हैदराबादच्या सलामीवीरांना कशी गोलंदाजी करतो हे सर्वांनाच पाहायला आवडेल.
सनरायझर्स हैदराबाद ः अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टिरक्षक), हेन्रीक क्लासेन, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, शिवांग कुमार, एशान मलिंगा, साकिब हुसेन.
इम्पॅक्ट प्लेअर ः ट्रव्हिस हेड
राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (फलंदाज), रायन पराग (कर्णधार), डोनोवन फरेरा, शुभम दुबे, दासून शनाका, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, यश राज पुंजा, ब्रिजेश शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर ः रवींद्र जडेजा
एलिमिनेटरचा सामना म्हणजे कर्णधारांची कसोटी असते; कारण हा सामना तुमची पुढची वाटचाल ठरवत असतो. पॅट कमिन्सला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा चांगलाच अनुभव आहे आणि तो मैदानातही जाणवतो. त्यामुळे हैदराबादची या हंगामातील कामगिरी उजवी झालेली आहे. दुसरीकडे रायन परागच्या नेतृत्वाचा ठसा दिसत नाही. संघातील खेळाडू आपली भूमिका चोख बजावत असल्यामुळे राजस्थान विजय मिळवत आहे; पण या सामन्यात पराग कशी विजयाची रणनीती आखणार की नाही हे पाहावे लागेल.