आरसीबीसमोर गुजरात टायटन्सच्या संघाने ‘क्वालिफायर 1’च्या सामन्यात सपशेल शरणागती पत्करली. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारच्या धारदार फटकेबाजीपुढे गुजरातच्या गोलंदाजांनी लोटांगण घातले. रजतने फक्त फक्त 33 चेंडूंत पाच चौकारांसह तब्बल 9 षटकारांची आतिषबाजी करत नाबाद 93 धावांची तुफानी खेळी साकारली. त्यामुळे आरसीबीला 254 धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यामुळेच आरसीबीने 92 धावांनी दणदणीत विजय साकारत फायनलमध्ये दमदार एंट्री केली आहे.
आरसीबीच्या 255 धावांचा पाठलाग करताना गुजरातची पॉवर प्लेमध्येच 5 बाद 51 अशी बिकट अवस्था झाली आणि तिथेच त्यांनी हा सामना गमावला. आता गुजरातला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी ‘क्वालिफायर 2’चा सामना खेळावा लागेल.
गुजरातने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले खरे, पण वेंकटेश अय्यरने पहिल्याच षटकात गोलंदाजीची पूर्ण हवाच करून टाकली. पहिल्याच षटकात खणखणीत तीन चौकार लगावत अय्यरने आरसीबीला झोकात सुरुवात करून दिली. अय्यर आता गुजरातसाठी कर्दनकाळ ठरणार असे दिसत होते, पण गुजरातच्या कागिसो रबाडाने त्याचा काटा काढत संघाला पहिले यश मिळवून दिले.
अय्यर फक्त 7 चेंडूंत 19 धावा करून बाद झाला आणि त्यानंतर विराट कोहलीने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. कोहलीने यावेळी पॉवर प्ले चांगलाच गाजवला. कोहली अर्धशतकाच्या दिशेने कूच करत होता, पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात जेसन होल्डरच्या चेंडूने कोहलीच्या बॅटची कडा घेतली आणि तो थेट स्टम्पवर जाऊन विसावला. कोहलीचा 43 धावांवर त्रिफळा उडाला, त्याने 25 चेंडूंत 5 चौकार आणि एक षटकार लगावला. होल्डरने या षटकातच देवदत्त पडीक्कललाही तंबूत धाडले. त्याला 19 चेंडूंत 5 चौकारांच्या जोरावर 30 धावा करता आल्या.
आरसीबीला एकाच षटकात दोन धक्के बसले होते. त्यामुळे गुजरात आरसीबीवर वरचढ होण्याचा प्रयत्न करत होती, पण यावेळी गुजरातचा डाव हा आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार आणि कृणाल पंडय़ा यांनी हाणून पाडला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली. गुजरातसाठी ही धोक्याची घंटा होती, पण पुन्हा एकदा रबाडा संघाच्या मदतीला धावून आला. रबाडाने कृणालला बाद करत आरसीबीला दुसरा धक्का दिला. कृणालला 28 चेंडूंत 5 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 43 धावांची खेळी साकारता आली.
कृणाल बाद झाला तरी कर्णधार पाटीदारने यशस्वी किल्ला लढवत संघाच्या विजयाचा पाया रचला.





