हिंदुस्थानची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हिला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचण्यांत सहभागी होण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम परवानगी दिली आहे. मातृत्वाला महिला खेळाडूच्या कारकिर्दीतील अडथळा मानता येणार नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवत राष्ट्रीय कुस्ती महासंघाच्या (डब्ल्यूएफआय) धोरणावर ताशेरे ओढले.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठाने हा महत्त्वपूर्ण अंतरिम आदेश दिला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड प्रक्रियेविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील एकल न्यायाधीशांच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या लेटर्स पेटंट अपीलवर सुनावणी करताना न्यायालयाने विनेशला दिलासा दिला.
डब्ल्यूएफआयने 2025 आणि 2026 मध्ये झालेल्या काही निवडक राष्ट्रीय स्पर्धांतील पदकविजेत्यांनाच आशियाई स्पर्धेच्या निवड चाचण्यांसाठी पात्र ठरवले होते. मात्र, गर्भधारणा, प्रसूती आणि त्यानंतरच्या विश्रांतीमुळे आपण या स्पर्धांत सहभागी होऊ शकले नाही, असा दावा करत विनेशने या धोरणाला न्यायालयात आव्हान दिले.





