विद्यमान जगज्जेता डी. गुकेश आणि युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद या हिंदुस्थानी खेळाडूंनी नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत दमदार सुरुवात केली. दोघांनीही क्लासिकल लढती अनिर्णित ठरल्यानंतर आर्मागेडन टायब्रेकमध्ये विजय मिळवत विजयी सलामी दिली. मात्र, जगातील अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.
मॅरेथॉन सामन्यात गुकेशचा विजय
गुकेश आणि जर्मनीच्या विन्सेंट किमर यांच्यात जवळपास पाच तास रंगलेल्या 144 चालींच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात क्लासिकल बाजी बरोबरीत सुटली. त्यानंतर झालेल्या आर्मागेडन टायब्रेकमध्ये गुकेशने अचूक खेळ करत विजय मिळवला आणि दीड गुणाची कमाई केली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात गुकेश काहीसा दबावाखाली दिसत होता, मात्र टायब्रेकमध्ये भारतीय खेळाडूने वर्चस्व गाजवले.
प्रज्ञानंदचाही टायब्रेकमध्ये दमदार खेळ
आर. प्रज्ञानंद आणि अमेरिकेच्या वेस्ली सो यांच्यातील क्लासिकल सामनादेखील अनिर्णित राहिला. मात्र, टायब्रेकमध्ये प्रज्ञानंदने अप्रतिम खेळ करत विजय खेचून आणला.
अलीरेझाची कार्लसनवर मात
दरम्यान, दिवसातील सर्वात मोठी चर्चा ठरली ती यजमान नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनच्या पराभवाची. फ्रान्सच्या अलीरेझा फिरोजाने कार्लसनला क्लासिकल लढतीत धूळ चारली. कार्लसनचे खाते अद्याप उघडलेले नाही.





