राजस्थान रॉयल्सच्या संघाने बुधवारी होणाऱया एलिमिनेटरच्या सामन्यात संघर्ष करत स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता ते मागे वळून पाहणार नाहीत. राजस्थानचे कोणते पाच खेळाडू सनरायझर्स हैदराबादचा सनसेट करू शकतात हे आता समोर आले आहे.
वैभव सूर्यवंशी
यंदाची आयपीएल खऱ्या अर्थाने गाजवली आहे ती वैभव सूर्यवंशीने. आपल्या घणाघाती फटकेबाजीच्या जोरावर वैभवने गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडले आहे. वैभव चांगल्या फॉर्मात असून आतापर्यंतच्या 14 सामन्यांत त्याने 583 धावा केल्या आहेत. यावरूनच तो कशी फलंदाजी करत आहे हे लक्षात येऊ शकते.
जोफ्रा तिरंदाज
एकहाती सामना फिरवणारा खेळाडू असे जोफ्रा आर्चरचे वर्णन करता येऊ शकते. गेल्या सामन्यात या गोष्टीचा प्रत्यय सर्वांनाच आला आहे. राजस्थानसाठी तो करो या मरो सामना होता. या सामन्यात दमदार अष्टपैलू कामगिरी करत जोफ्राने राजस्थानला एकहाती विजय मिळवून दिला होता.
यशस्वी जैस्वाल
वैभवचा सहकारी म्हणून यशस्वी जैसवालकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण आतापर्यंत यशस्वीची बॅट शांत राहिलेली आहे. पण यशस्वी हा मोठय़ा सामन्यांमध्ये दडपण न घेता खेळतो. त्यामुळे राजस्थानला या सामन्यात त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा असतील.
रवींद्र जडेजा
राजस्थानच्या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू म्हणून जाडेजाकडे पाहिले जाते. अचूक गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी यासाठी जडेजा ओळखला जातो. जाडेजाने गेल्या काही सामन्यांत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतील.
डोनोव्हन फरेरा
दक्षिण आफ्रिकेचा डोनोवन फरेरा हा राजस्थानच्या संघातील सायलेंट किलर आहे. फरेरा यंदाच्या आयपीएलमध्ये चांगल्या लयीत आहे. फरेराने या हंगामात 170.06 च्या स्ट्राइक रेटने 13 सामन्यांत 267 धावा केल्या आहेत.





