आगामी टी२० मुंबई लीग २०२६ स्पर्धेसाठी ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघाने मोठी घोषणा करत हिंदुस्थानचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. मुंबई क्रिकेटमध्ये अनेक वर्षांचा अनुभव असलेल्या धवल कुलकर्णीकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही मोठा अनुभव आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघ अधिक चांगली कामगिरी करेल अशी आशा आहे.
यंदा लक्ष्य फक्त विजेतेपदाचे
गेल्या हंगामात ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा प्रवास उपांत्य फेरीपर्यंत झाला होता. मात्र, अंतिम फेरीचे स्वप्न थोडक्यात हुकले. त्यामुळे यंदाच्या हंगामात विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने संघ मैदानात उतरणार आहे. संघात हिंदुस्थानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुलठाकूर याच्यासह अनेक प्रतिभावान युवा खेळाडूंचा समावेश असून अनुभव आणि तरुणाईचे उत्तम मिश्रण संघात पाहायला मिळत आहे.
खेळाडूंना निर्भय क्रिकेट खेळायला प्रोत्साहन
आतापर्यंतचा अनुभव खूप सकारात्मक राहिला आहे. संघातील प्रत्येक खेळाडू उत्साहाने तयारी करत असून सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही संघात असे वातावरण निर्माण करत आहोत जिथे खेळाडू जबाबदारी स्वीकारतील आणि कोणत्याही निर्भयपणे आपला नैसर्गिक खेळ खेळतील, असे मुख्य प्रशिक्षकपद स्वीकारल्यानंतर धवल कुलकर्णी यांनी सांगितले.





