वयाच्या 14व्या वर्षी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधणारा क्रिकेटपटू म्हणून वैभव सूर्यवंशी ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. सध्या वैभव सूर्यवंशी क्रिकेटमुळे नाही तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. तो एका चित्रपटात दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता हा चित्रपट कोणता आहे? जाणून घेऊया…
बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वैभव सूर्यवंशीचे भरभरुन कौतुक केले आहे. तसेच त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट ‘मासूम: द न्यू जनरेशन’मध्ये वैभवला घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. चित्रपट निर्मात्याच्या या पोस्टने सोशल मीडियावर नवीनच खळबळ उडवून दिली आहे.
शेखर कपूर यांनी १९९६ मध्ये ‘मासूम’ हा चित्रपट बनवला होता, ज्यामध्ये नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी दिसले होते. आता शेखर कपूर या चित्रपटाचा सीक्वल ‘मासूम: द न्यू जनरेशन’ बनवण्याची योजना आखत आहेत. वृत्तांनुसार, या चित्रपटात दिग्गज संगीतकार ए. आर. रहमान आपले संगीत देणार आहेत. दरम्यान, शेखर कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी आयपीएल २०२६ चा युवा क्रिकेटपटू आणि ‘न्यू सेंसेशन’ वैभव सूर्यवंशी याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
‘मासूम’ चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर कपूर हे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शानदार फलंदाजीचे चाहते झाले आहेत. शेखर कपूर यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया ‘एक्स’ अकाऊंटवर वैभव सूर्यवंशीचा फोटो शेअर करत लिहिले की, ‘जर सूर्यवंशी इतका लोकप्रिय आणि शानदार क्रिकेटपटू नसता, तर मी त्याला माझ्या ‘मासूम: द न्यू जनरेशन’ या चित्रपटात कास्ट केले असते.’ शेखर यांची ही पोस्ट काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाली, त्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.