मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) (Mhada) मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे 2,640 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सोडतीसाठी 75,366 अर्ज प्राप्त झाले असून प्रती सदनिका सरासरी 28.54 अर्ज प्राप्त झाले आहेत. ही बाब मुंबईकरांचा (Mumbai) म्हाडावरील वाढता विश्वास आणि परवडणाऱ्या घरांसाठीची मोठी मागणी अधोरेखित करते.
मुंबई मंडळातर्फे संगणकीय सोडतीच्या प्रक्रियेची तयारी पूर्ण करण्यात येत असून विधान परिषद निवडणुकांसाठी लागू आचारसंहिता संपल्यानंतर सोडतीची तारीख, वेळ व स्थळ जाहीर करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता (MCC) लागू असून सदर आचारसंहितेची अंतिम तारीख 25 जून, 2026 आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या दिवसापासून ते संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अधिकृतपणे पूर्ण होईपर्यंत आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी केली जाते. त्यामुळे आदर्श आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर सोडतीचा दिनांक जाहीर करण्यात येईल.
मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाव्दारे प्राप्त विविध वसाहतीमधील विक्री योग्य एकुण 2640 सदनिका उपलब्ध झाल्या. या सदनिकांमध्ये नव्याने बांधकाम चालु असलेल्या सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका व पणन विभागातील विविध कारणांमुळे रिक्त व प्रतिक्षायादी संपुष्टात असलेल्या सदनिकांच्या विक्रीसाठी दिनांक 30 मार्च 2026 रोजी विविध वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. यानुसार इच्छुक अर्जदारांना दिनांक 28 मे 2026 रोजीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली. मुंबई मंडळांने सदनिकांची कमी केलेली विक्री किमंत, काही योजनांना दिलेल्या सुविधा, पार्कीग सुविधा, उत्कृष्ठ दर्जाचे बांधकाम, योजनांची महत्वाची ठिकाणे, बाजारमुल्यापेक्षा कमी किंमत इत्यादीचा अर्जदारांकडून विचार करता सोडतीसाठी भरघोस प्रतिसाद प्राप्त झाला आहे.
सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी 10 जून, २०२६ रोजी दुपारी 3 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 12 जून, 2026 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील. त्यानंतर प्राप्त दावे-हरकतींची छाननी करून 16 जून रोजी दुपारी 3 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जदारांची अंतिम यादी म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मुंबई मंडळाने 30 मार्च 2026 रोजी कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा-पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव आणि अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांसाठी 2640 सदनिकांची संगणकीय सोडत जाहीर केली होती. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 145, अल्प उत्पन्न गटासाठी 858, मध्यम उत्पन्न गटासाठी 798 आणि उच्च उत्पन्न गटासाठी 839 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांच्या सोयीसाठी बांधकाम सुरू असलेल्या सदनिकांच्या गटातील कन्नमवार नगर, विक्रोळी (पूर्व) येथील संकेत क्रमांक 538 व 539 मधील 1221 सदनिकांच्या विक्री किमतीत 7.5 टक्के कपात करण्यात आली. मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार या 1221 सदनिकांपैकी 610 सदनिका नवीन संकेत क्रमांक 538-अ व 539-अ अंतर्गत केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या. या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटातील अधिकाधिक नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले आणि परवडणाऱ्या किमतीतील घर मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली व त्यासही अर्जदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. संगणकीय सोडतीची तारीख, वेळ आणि स्थळ याबाबतची सविस्तर माहिती पुढील काळात म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.