आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
जयदीप मेढे June 01, 2026 10:13 PM

Vaibhav Sooryavanshi: या हंगामात मी दबावाखाली कसे खेळायचे आणि परिस्थितीनुसार माझ्या खेळात कसा बदल करायचा हे शिकलो. जर मला दीर्घकाळ खेळायचे असेल, तर तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे असल्याची प्रतिक्रिया अवघ्या 15 वर्षीय वैभव सुर्यवंशीने दिली. राजस्थानकडून आयपीएलचा दुसरा हंगाम खेळताना वैभवने चक्रीवादळ आणलं. वैभवने 16 डावांमध्ये 48.50 च्या सरासरीने आणि 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. तो या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरल्याने ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला.  

अंतिम सामन्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी वैभव रविवारी अहमदाबादला पोहोचला. त्याला स्पर्धेचा 'सर्वाधिक मौल्यवान खेळाडू' म्हणून घोषित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यादरम्यान त्याने सुनील गावस्कर आणि इतर तज्ज्ञांशी संवाद साधला.

प्रत्येक सामना एकाच पद्धतीने खेळू शकत नाही

वैभव म्हणाला, "तुम्ही प्रत्येक सामना एकाच पद्धतीने खेळू शकत नाही. तुम्हाला परिस्थिती ओळखून गरजेनुसार फलंदाजी करावी लागते." हे मी प्लेऑफ सामन्यांमध्ये खूप चांगल्या प्रकारे शिकलो. वैभवने क्वालिफायर 2 मध्ये गुजरातविरुद्ध आपल्या नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरुद्ध फलंदाजी केली. त्याने 47 चेंडूंमध्ये 96 धावा केल्या. सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर त्याने रवींद्र जडेजासोबत अर्धशतकी भागीदारी करून डाव सावरला. मात्र, तो आपल्या संघाला अंतिम फेरीत पोहोचवू शकला नाही.

मी माझ्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवतो

षटकार मारण्याच्या आपल्या क्षमतेबद्दल बोलताना वैभव सूर्यवंशी म्हणाला, "मी फक्त माझ्या नैसर्गिक खेळावर विश्वास ठेवतो. जर मला वाटले की मी चेंडूवर मोठा फटका मारू शकेन, तर मी तो पूर्ण ताकदीने मारतो." तो गंमतीने पुढे म्हणाला, "सर, मी सध्या दूध पीत नाहीये"

फिटनेसला प्राधान्य असेल

वैभव म्हणाला, "मला माझ्या देशासाठी आणि माझ्या संघासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळायचे आहे. त्यासाठी, मला माझ्या फिटनेसवर कठोर परिश्रम करावे लागतील आणि दुखापती टाळाव्या लागतील." या मोसमात वैभवचे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद शतक एका चेंडूने हुकलं.

राजस्थान रॉयल्समधील वातावरण उत्कृष्ट  

राजस्थान रॉयल्सच्या ड्रेसिंग रूममधील वातावरणाबद्दल वैभव म्हणाला, "व्यवस्थापन आणि संघातील प्रत्येकजण खूप सहकार्य करतो. सर्व वरिष्ठ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मला नेहमीच प्रोत्साहन देतात. संघातील प्रत्येकजण अनुभवी आणि उच्च-स्तरीय आहे. त्यामुळे, मला त्यांच्याकडून दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळते. आमच्या कॅम्पमधील वातावरण उत्कृष्ट आहे."

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.