मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या एका मुलाखतीमधील लूकमुळे सोशल मीडियावर तुफान चर्चेत आली होती. निळ्या साडीतील तिचे फोटो आणि व्हिडीओ इतके व्हायरल झाले की नेटकरी तिला ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखू लागले. या निळ्या साडीतील गिरीजाचा लूक अत्यंत साधा होता, पण त्याच सहज सौंदर्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत गिरीजा याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. यामध्ये अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतसुद्धा तिच्यासोबत मुख्य भूमिकेत आहेत. ‘नॅशनल क्रशचा हा टॅग मी कमावला नाही’, अशी भावना तिने यावेळी व्यक्त केली. त्यावर कंगना यांनीसुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
मुलाखतकर्त्याने जेव्हा गिरीजाच्या निळ्या साडीतील लूकचा उल्लेख केला, तेव्हा कंगनाने कुतूहलाने विचारलं, “हे निळ्या साडीचं काय प्रकरण आहे? मीसुद्धा ऐकलंय.” तेव्हा गिरीजा तिला समजावून सांगते, “माझ्या एका पॉडकास्ट मुलाखतीमधील क्लिप व्हायरल झाली होती. लोकांनी ती क्लिप इतकी शेअर केली की सोशल मीडियावर त्याचा पाऊसच पडला होता. त्यामागे काहीच लॉजिक किंवा कारण नव्हतं. अनेकजण माझ्या दिसण्यावरून कमेंट करू लागले होते. अखेर मला असं वाटलं की, ही काही माझी उपलब्धी किंवा मी मिळवलेलं यश नाही. हे मला माझ्या आई-वडिलांकडूनच मिळालं आहे. मी कशी दिसते, यात माझं काहीच योगदान नाही.”
View this post on Instagram
A post shared by Manikarnika Films Production (@manikarnikafilms)
गिरीजाचं हे उत्तर ऐकल्यानंतर कंगना म्हणतात, “मी खूप खुश आहे की तू माझ्या चित्रपटात काम करतेयस. कृपया तुझ्या सौंदर्याचा वापर करून या चित्रपटाला प्रमोट कर.” त्यावर गिरीजाही हसते. ‘नॅशनल क्रश’ या टॅगचा पुरेपूर वापर करत नसल्याची बाब जेव्हा मुलाखतकर्त्याने बोलून दाखवली, तेव्हा गिरीजा तिची बाजू मांडत स्पष्ट केलं, “एखादी गोष्ट नॅशनल होण्यासाठीचं प्रमाणपत्र कुठे मिळतं, ते मला सांगा. त्यांनी (कंगना) नॅशनल होणं मी योग्य समजू शकते. पण मला नॅशनल क्रश म्हणण्यात काहीच अर्थ नाही.”
‘नॅशनल क्रश’ म्हणून व्हायरल झाल्यानंतर एका मुलाखतीत गिरीजाने सांगितलं होतं की, या गोष्टीमुळे किंवा इतकं व्हायरल झाल्यामुळे तिच्यासाठी काहीच बदललं नाही. तिला कामाचे काही नवीन ऑफर्स आले नाहीत. मात्र सोशल मीडियावर तिचे बनावट आणि एआय जनरेटेड फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे तिला खूप त्रास झाला.