Dr. Yugandhara Bhonde Success Story : देशसेवा ही केवळ एक उपजीविका किंवा नोकरी नसते, ती मनात रुजलेली एक अखंड साधना आणि उराशी बाळगलेला ध्यास असतो. या ध्यासाच्या मार्गावर चालताना अनेकदा स्वतःच्या सुख-दुःखांवर आणि कौटुंबिक भावनांवरही मात करावी लागते. पुण्याच्या डॉ. युगंधरा भोंडे यांनी या विधानाचा एक जिवंत वस्तुपाठ देशासमोर ठेवला आहे. वैद्यकीय क्षेत्रातून रुग्णसेवा करणाऱ्या या डॉक्टर तरुणीने जेव्हा अंगावर सैन्याचा गणवेश परिधान करून देशसेवेचा संकल्प केला, तेव्हा तिच्यासमोर केवळ शारीरिक प्रशिक्षणाचे आव्हान नव्हतं, तर एका आईच्या ममतेचीही कठीण परीक्षा होती. मात्र, असीम जिद्द आणि दृढनिश्चयाच्या जोरावर युगंधरा यांनी हे यश संपादन केलं.
डॉ. युगंधरा भोंडे यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे (CAPF MOSB) अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलं. मुसुरी येथील प्रसिद्ध आयटीबीपी (ITBP) अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्या 'असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर' (क्लास वन ऑफिसर) या उच्च पदावर विराजमान झाल्या आहेत. ज्यावेळी त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली, तेव्हा त्यांची मुलगी 'मीरा' अवघी दीड वर्षांची होती. एका बाजूला तान्हे बाळ आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रसेवेचं कर्तव्य अशा कठीण परिस्थितीत त्यांनी हा धैर्याचा मार्ग निवडला.
डॉ. युगंधरा या मूळच्या नागपूरच्या असून दिवंगत प्रा. हरिदास आणि संध्या भोंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना घरातूनच समाजसेवेचा समृद्ध वारसा मिळाला होता. त्यांनी अमरावतीच्या पीडीएमसी (PDMC) महाविद्यालयातून आपले एमबीबीएसचे (MBBS) वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.
वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विवाहबंधनात अडकलेल्या युगंधरा यांनी पुढे दिल्लीच्या प्रतिष्ठित 'एम्स' (AIIMS) रुग्णालयातही काही काळ काम करून आपले वैद्यकीय कौशल्य सिद्ध केलं.
डॉ. युगंधरा यांचे पती प्रतीक सोनारे हे देखील यूपीएससी (UPSC) परीक्षा उत्तीर्ण करून आधीच भारतीय सुरक्षा दलात उच्च पदावर कार्यरत आहेत. पतीची देशसेवा आणि त्यांचे देशाप्रती असलेले समर्पण हेच युगंधरा यांच्यासाठी मोठी प्रेरणा ठरलं. लष्कर किंवा सुरक्षा दलात केवळ लढवय्या जवानांचीच नव्हे, तर युद्धभूमीवर सैनिकांचे प्राण वाचवणाऱ्या खंबीर डॉक्टरांचीही तेवढीच गरज असते, हे ओळखून त्यांनी पतीच्याच मार्गावर चालण्याचा धाडसी निर्णय घेतला.
असिस्टंट कमांडन्ट मेडिकल ऑफिसर या पदावर निवड झाल्यानंतर त्यांना मुसुरीच्या आयटीबीपी अकॅडमीत सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. सुरक्षा दलात तुम्ही डॉक्टर असा किंवा अन्य कोणत्याही पदावर, आणीबाणीच्या वेळी थेट सीमेवर जाऊन लढण्याची तयारी ठेवावी लागते, हा नियमच आहे. या सहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्यांना केवळ वैद्यकीय ज्ञानच नाही, तर हातात बंदूक घेऊन शत्रूचा सामना करण्याचे लष्करी कौशल्यही आत्मसात करावं लागलं.
घनदाट जंगलात वास्तव्य करणे, मुसुरीच्या हाडे गोठवणाऱ्या थंडीत सलग तीन-तीन दिवस केवळ एक लिटर पाण्यावर तग धरून राहणे आणि अवघड डोंगर-दऱ्यांमधून मार्गक्रमण करणे हा या प्रशिक्षणाचा भाग होता. यापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी अमृतसर येथे पोस्टेड असताना त्यांनी अशा कठीण परिस्थितीचा धीरोदात्तपणे सामना केला होता, ज्याचा फायदा त्यांना या प्रशिक्षणात झाला.
मुसुरीच्या जंगलातील थंडी आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य यापेक्षाही एक आई म्हणून डॉ. युगंधरा यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं; ते म्हणजे आपल्या अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकल्या लेकीपासून अनेक महिने दूर राहणे. एका आईसाठी आपल्या तान्ह्या बाळाला मागे सोडून देशसेवेचं व्रत घेणं हे एखाद्या कठोर तपश्चर्येपेक्षा कमी नव्हते.
या भावनिक संघर्षाच्या काळात त्यांच्या पाठीशी त्यांचे सासू-सासरे डॉ. सरोज आणि डॉ. चंद्रकांत सोनारे हे खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी आपल्या नातीला मायेची ऊब दिली, ज्यामुळे युगंधरा या आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकल्या. जोडीला पती प्रतीक सोनारे यांचा अभेद्य पाठिंबा होताच. कुटुंबाच्या याच भक्कम साथीमुळे मातृत्वाची कसोटी देताना त्यांच्यातील कर्तृत्ववान अधिकारी कुठेही कमी पडला नाही. हातात स्टेथोस्कोप धरणारे हात प्रसंगी देशाच्या रक्षणासाठी शस्त्रही तेवढ्याच लिलया पेलू शकतात, हे त्यांनी देशातील स्त्री-शक्तीला सिद्ध करून दाखवले आहे.
ही बातमी वाचा: