एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. 23 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीने आत्महत्या केली आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची तक्रार मानसीच्या कुटुंबियांनी पोलिसात केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. तसेच मानसीच्या पतीला देखील पोलिसांनी अटक केली आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील सहादतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मानसीच्या आत्महत्या केल्याचे समोर आले. नंतर वडिलांनी मानसीचा पती सागर राजपूत, सासरे आणि दोन नणंदांविरुद्ध हुंडाबळीचा एफआयआर (FIR) दाखल केला आहे. मानसीच्या शवविच्छेदन (पोस्टमार्टम) अहवालात आत्महत्येची पुष्टी झाली आहे. महानगरपालिकेत कंत्राटी तत्त्वावर कॉम्प्युटर ऑपरेटर असलेला सागर राजपूत हा एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरदेखील आहे. दीड वर्षापूर्वी सागरचे मानसीसोबत लग्न झाले होते.
हुंड्यात एसयूव्ही (SUV) आणि प्लॉटची करत होता मागणी
तक्रारीमध्ये असा आरोप आहे की, लग्नानंतर लगेचच मानसीच्या कुटुंबाकडे हुंड्यात एसयूव्ही (SUV) कार आणि प्लॉटची मागणी केली जात होती. विरोध केल्यावर मानसीला त्रास दिला जायचा आणि तिला मारहाण केली जायची. सागरचे दुसऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याची बाबही समोर येत आहे. सहादतगंज पोलिसांनी आरोपी सागरला ताब्यात घेतले आहे. शनिवारी रात्री मानसीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. असे सांगितले जात आहे की, सागरचे इन्स्टाग्रामवर ७.९३ लाख फॉलोअर्स आहेत. मानसीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या लोकांनी त्यांच्या मुलीची हत्या करून मृतदेह लटकवला आहे. पती सागर राजपूतसह ६ जणांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.
मागणी पूर्ण न झाल्याने सागर राजपूत करायचा मारहाण
मृत मानसीच्या कुटुंबाचे म्हणणे आहे की, त्यांनी लग्नात त्यांच्या क्षमतेनुसार रोख रक्कम, मानपान आणि घरातील साहित्य दिले होते. असे असूनही सासरची मंडळी खूश नव्हती. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, पती आणि इतर नातेवाईक सतत कारची मागणी करत होते. मागणी पूर्ण न झाल्याने मानसीला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. नातेवाईकांचा दावा आहे की, मानसीने अनेकदा फोनवर तिच्यासोबत होत असलेल्या या गैरवर्तनाची माहिती दिली होती. दोन्ही कुटुंबांमध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी मानसीच्या कुटुंबातील सदस्य अनेकदा लखनौला पोहोचले होते. मात्र, परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नव्हती.