सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी स्वत: नेतृत्व करीत गुरुवारी (ता. ४) कवठे, मुळेगाव तांडा येथील हातभट्ट्यांवर छापे टाकले. त्याठिकाणी रबरी ट्युबमध्ये आढळलेली हातभट्टी जागेवरच नष्ट केली. सकाळी सहाच्या सुमारास हे पथक कारवाईसाठी तेथे पोचले होते.
पुण्यात मिथेनॉलमिश्रित हातभट्टी पिऊन २७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सोलापूरसह राज्यभरातील राज्य उत्पादन शुल्क विभाग हातभट्टीविरोधात मैदानात उतरला आहे. सोलापूरच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हातभट्टी दारु किती विषारी आहे, त्याच्या सेवनातून काय दुष्परिणाम होतात यावर जनजागृती सुरू केली आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिकांच्या घंटागाड्यांमधील स्पीकरद्वारे, स्वत:च्या विभागातील वाहने, काही प्रवासी रिक्षांवर पोस्टर लावले आहेत.
ज्या गावांच्या हद्दीत हातभट्ट्या आहेत तेथील पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक, तलाठ्यांच्याही बैठका सुरु केल्या आहेत. याशिवाय स्वत:ही कारवाईसाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवारी कवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील भोजप्पा तांडा परिसरात एका हातभट्टी व्यवसायिकाने गावठी दारु तयार करण्यासाठी जमिनीतच खोलवर बॅरेल पुरले होते. सहजपणे ते दिसणार नाही अशी व्यवस्था केली होती. तरीपण, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ते बॅरल शोधून काढले. आता दररोज हातभट्ट्यांवर कारवाई सुरूच राहील, असा इशाराही अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिला आहे.
सोलापूर शहरात रुट मार्च, रस्त्यांवरील हातगाडे उचलले
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी पहिल्यांदाच सोलापूर शहरात रुट मार्च काढला. रेल्वे स्टेशन रोड, रामलाल चौक परिसरात त्यांनी महापालिका, सोलापूर शहर पोलिसांच्या मदतीने रस्त्यांलगत उभारलेले हातगाडे, अतिक्रमण केलेल्या टपऱ्या, दुकाने काढली.
कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांमधील रणरागिणीही
राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्ट्यांवरील कारवाई तीव्र केली आहे. त्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे मनुष्यबळ मागितले होते. त्यानुसार पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला १० महिला पोलिस अंमलदार दिल्या आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या नेतृत्वात त्या रणरागिणी देखील कारवाईसाठी मैदानात उतरल्या होत्या.