तात्या लांडगे
सोलापूर : इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून १३ जून रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. पहिल्या प्रवेश यादीनुसार सोलापूर जिल्ह्यातील १६ हजार ८४५ विद्यार्थ्यांनी पसंतीच्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित केले आहेत.
पहिल्या प्रवेश फेरीत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज अनलॉक करण्यात आल्याने सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश अर्ज (भाग एक व भाग दोन) लॉक करणे बंधनकारक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अकरावी प्रवेशासाठी अर्ज केलेला नाही, त्यांना ६ ते ९ जून या दिवसांत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. एक ते दहा महाविद्यालयांचे पसंतीक्रम त्यांना अर्जात नमूद करावे लागणार आहेत. पूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनाही या काळात पसंतीक्रम बदलता येणार आहे. १३ जून रोजी सकाळी दहा वाजता पोर्टलवर कनिष्ठ महाविद्यालयांची यादी प्रदर्शित केली जाणार आहे.
विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी वाटप केलेल्या महाविद्यालयांची यादी दिसेल. महाविद्यालयांना त्यांच्याकडे नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांची यादी दिसेल. १३ ते १६ जून या काळात विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, त्यांना तेथील प्रवेश रद्द करावा लागणार आहे. १९ जूननंतर तिसरी प्रवेश फेरी जाहीर होणार आहे. प्रवेशाची पाचवी विशेष फेरी मुलींसाठी असणार आहे. १ ते १५ जुलै दरम्यान अकरावीचे वर्ग सुरु होणार आहेत.
पहिल्या फेरीतील विद्यार्थी
२०,६४६
प्रवेश घेतलेले विद्यार्थी
१६,८४५
प्रवेश न घेतलेले विद्यार्थी
३,५११
प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी
२,२५३
प्रवेशाचे पुढील वेळापत्रक असे...
नवीन विद्यार्थी नोंदणी, भाग-एकमधील दुरुस्ती : ६ ते ९ जून
गुणवत्तेनुसार महाविद्यालयांचे वाटप : १० ते १२ जून
लॉगिनवर महाविद्यालये व विद्यार्थ्यांची यादी प्रदर्शित, कटऑफ यादी प्रसिद्ध : १३ जून
प्रवेश घेण्यासाठी कालवधी : १३ ते १६ जून
रिक्त जागांनुसार तिसऱ्या यादीचे वेळापत्रक जाहीर : १८ जून