नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणूक प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारणात खळबळ उडाली होती. याप्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यामुळे राजकारण कमालीचे तापले आहे. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून (SIT) ६ तास कसून चौकशी करण्यात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक खळबळजनक ट्वीट करत महायुती सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. या प्रकरणात केवळ चाकणकर यांनाच टार्गेट केले जात असून, मुख्य राजकीय सूत्रधार अद्याप नामानिराळे असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.
रोहित पवार यांनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत एका ट्रॅव्हल कंपनीच्या काही डिटेल्स पाहायला मिळत आहे. यात अशोक खरात, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर आणि सुनील तटकरे अशी नाव पाहायला मिळत असून त्यावर काही तारखा आणि रक्कमेचा उल्लेख मिळत आहे. यासोबतच रोहित पवारांनी एक ट्वीटही केले आहे.
रोहित पवारांचे ट्वीटसत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी आणि मंत्री पदापाठोपाठ विधान परिषदेची आमदारकीही स्वतःच्याच घरात ठेवली. माँ कामाख्या देवीला गेलेल्यांपैकी एका व्यक्तीची दोन्ही पदं गेली तर दुसऱ्याच्या घरात मात्र आधीच दोन-दोन पदं असताना आता तिसरंही आलं.. हा आहे महाराष्ट्रातला पॉलिटिकल गेम…!, असे रोहित पवार म्हणाले.
खरा सूत्रधार स्वतःला वाचवतोय, रोहित पवारांचा आरोपसत्तेतील तिन्ही घटक पक्षातील नेत्यांचा खरात प्रकरणात थेट संबंध असूनही आतापर्यंत त्यापैकी केवळ एकाच व्यक्तीला टार्गेट करण्यात आलं.. टार्गेट केलेल्या या व्यक्तीसोबत असलेली दुसरी व्यक्ती राजकीयदृष्ट्या अधिक वजनदार असूनही ते मात्र खरात प्रकरणातून नामानिराळे आहेत आणि आता तर खासदारकी… pic.twitter.com/6y3Obh8gvy
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 5, 2026
दरम्यान भोंदूबाबा अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांच्या पाद्यपूजेचे व्हिडीओ आणि ‘शिवनिका ट्रस्ट’मधील त्यांचे कथित आर्थिक संबंध समोर आल्यानंतर त्यांना महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र, रोहित पवारांच्या दाव्यानुसार हे प्रकरण केवळ भोंदूगिरीपुरते मर्यादित नसून यात कोट्यवधी रुपयांचे काळे धन आणि बड्या राजकीय नेत्यांचे लागेबांधे आहेत. अशोक खरातने अनेक नेत्यांच्या फोटोंवर फुली मारून जादूटोणा केल्याचा प्रकारही समोर आला आहे. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या आड सत्ताधारी पक्षातील खरा सूत्रधार स्वतःला वाचवत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.