गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
युवराज जाधव June 05, 2026 03:13 PM

Gold Silver Rates Today 5 June नवी दिल्ली : देशांतर्गत वायदे बाजारात म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आरबीआयच्या रेपो रेटच्या दरात गुंतवणूकदारांमध्ये सतर्कता पाहायला मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरीचा परिणाम देशांतर्गत बाजारात पाहायला मिळाला. आखाती देशांमधील तणाव कमी न झाल्यानं आणि व्याज दरांबाबत स्थिती स्पष्ट नसल्यानं सोने आणि चांदीच्या दरात तेजी आणि घसरण कायम राहू शकते. 24 कॅरेट सोन्याच्या दरात आज 1896 रुपयांची घसरण झालेय. तर, एक किलो चांदीच्या दरात देखील 6138 रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Rate :  सोन्याच्या दरात घसरण

इंडिया बुलियन  ज्वेलर्स असोसिएशनकडून जाहीर करण्यात आलेल्या दरांनुसार काल 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 156086 रुपये होता. 24 कॅरेट सोन्याचा दर 154190 रुपयांवर आला आहे म्हणजेच आज सोन्याचे दर 1896 रुपयांनी कमी झाले आहेत. 

23 कॅरेट सोन्याचे दर काल 155461 रुपयांवर होते. आज एका तोळ्याचा दर 153573 रुपयांवर आला आहे.  एका तोळ्याच्या दरात आज 1888 रुपयांची घसरण झाली आहे. 

22 कॅरेट सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरु आहे. एका तोळ्याचा दर 142975 रुपयांवरुन कमी होऊन 141238 रुपयांवर आला आहे. एक तोळे सोन्याचा दर 1737 रुपयांनी घसरला आहे. 

18 कॅरेट सोन्याच्या दरात देखील घसरण झाली आहे. 18 कॅरेट सोन्याचा कालचा दर 117065 रुपयांवरुन कमी होऊन 115643 रुपयांवर आला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात आज 1422 रुपयांची घसरण झाली आहे.  

चांदीच्या दरात देखील आज मोठी घसरण झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार चांदीचा काल 1 किलोचा दर 261088 रुपये होता. त्यामध्ये आज 6138 रुपयांची घसरण झाली. चांदीचा आजचा एक किलोचा दर 254950 रुपये इतका आहे.

एमसीएक्सवर सोन्याच्या दरात घसरण 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर देखील आज सोन्याच्या वायद्याच्या दरात घसरण झाली होती. आज सकाळी वायदे सुरु झाल्यानंतर सोन्याच्या दरात 1217 रुपयांची घसरण झाली होती. एमसीएक्सवर सोन्याचा दर 158330 रुपयांवर पोहोचला होता.चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं एमसीएक्सवर पाहायला मिळालं.  चांदीचा एक किलोचा दर 260024 रुपये होता.  भारतात सोने आणि चांदीच्या दरात घसरण झालीय, त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढल्यानं सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे. इराणचा समर्थक असलेल्या लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव फेटाळला आहे. दुसरीकडे इस्त्रायलनं देखील सैन्य मागे घेण्यास नकार दिलेला आहे. यामुळं अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराच्या शक्यतांना धक्का पोहोचला आहे.  याशिवाय अमेरिकन फेड रिझर्व्ह या वर्षाच्या अखेरपर्यंत व्याज दरात वाढ करण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळं सोने आणि चांदीच्या दरांवर परिणाम होतोय. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.