नाशिक विधान परिषद निवडणूक 2026: राज्यातील विधानपरिषद निवडणुकीची (Vidhan Parishad Election) रणधुमाळी शिगेला पोहोचली असताना नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुती समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे महायुतीला (Mahayuti) मोठा हादरा बसला असून, बंडखोरीचे वादळ शमवण्यात भाजपचे संकटमोचक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना अपयश आले आहे. या पार्श्वभूमीवर, हे दोन्ही नेते आज नाशिकमध्ये दाखल झाले असून निवडणुकीचा सविस्तर आढावा (Review) घेणार आहेत. मात्र, दुसरीकडे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर ते गोकुळ गीते यांची मनधरणी करून त्यांचा जाहीर पाठिंबा मिळवण्याची रणनीती आखत आहेत. परंतु, “जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेली आहे”, अशा कडक शब्दांत गीतेंनी महायुतीला सुनावले आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांचे बंधू आणि भाजपचे सक्रिय नेते गणेश गीते (Ganesh Gite) यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत माघार घेतली. मात्र, गोकुळ गीते स्वतः रिंगणात कायम असल्याने नाशिकमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांच्या विरोधात गोकुळ गीते आणि भाजपचे मालेगावचे नेते प्रसाद हिरे (Prasad Hire) असा तिरंगी सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुणाल दराडे यांनी फोनवरून दिलेल्या अर्वाच्च भाषेतील धमकीमुळे आपण निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे गोकुळ गीते यांनी सांगितले. “समोरच्या उमेदवाराच्या मुलाने माझा बाप काढला, त्यामुळे मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त आहे”, असे सांगत त्यांनी दराडे कुटुंबावर जोरदार निशाणा साधला. तसेच, महायुतीचे उमेदवार हे क्रियाशील नसून निष्क्रिय आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. “या निष्क्रिय उमेदवारासाठी भाजप युतीचे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत, माझी विनंती आहे की त्यांनी माझ्यावर दबाव आणू नये”, असे आवाहन त्यांनी नेत्यांना केले आहे. आपला प्रचार सुरू झाला असून सर्वाधिक नगरसेवक आपल्यासोबत येतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केल्याने नाशिकमधील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
एबीपी माझाशी बोलताना अपक्ष उमेदवार गोकुळ गीते म्हणाले की, मला आत्ता समजलं मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत नाशिकमध्ये आले आहेत. माझा अजून तरी कोणासोबत काहीही संपर्क झालेला नाही. माझा कोणताही गैरसमज झालेला नाही, मी माघार घ्यायची ठरवली असती तर कालच घेतली असती. समोरच्या उमेदवाराच्या मुलाने माझा बाप काढला, त्यामुळे मला उमेदवारी करणे क्रमप्राप्त आहे. समोरच्या उमेदवाराने जर माझ्या घरी येऊन मला विनंती केली असती, तर मी माघारीचा विचार केला असता. कुणाल दराडे यांनी ऑडिओ क्लिप चेक करावी, आता मला वेळ नाही, मी निवडणुकीच्या धावपळीत आहे. युतीतील नेत्यांची काय चर्चा सुरू आहे मला त्याची कल्पना नाही, मला त्यातील माहिती मिळाली तर मी देईल. जाहीर पाठिंबा देण्याचा विषय येत नाही, निवडणूक खूप पुढे गेली आहे, ही काही ग्राम पातळीवरची निवडणूक नाही, असे त्यांनी म्हटले.
गोकुळ गीते पुढे म्हणाले की, माझ्यासमोरचा उमेदवार क्रियाशील नाही. मी भाजपचा बंडखोर नाही, माझे बंधू गणेश गीते भाजपचे सक्रिय नेते आहेत. भाजपचे लोक माझ्यावर का दबाव टाकत आहेत हे मला कळत नाही. नाशिक नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळी माझ्यावर ओझर पिंपळगावची जबाबदारी होती, त्या ठिकाणी मी सर्वाधिक नगरसेवक निवडून आणले. हे उमेदवार नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी कुठे होते? निवडणुकीच्या काळात हे दिसले नाहीत. या निष्क्रिय उमेदवारासाठी भाजप युतीचे नेते माझ्यावर दबाव आणत आहेत, माझी विनंती आहे त्यांनी माझ्यावर दबाव आणू नये. गणेश गीते यांनीच ही निवडणूक लढवावी असं समर्थकांचं मत होतं. महायुतीमध्ये ही जागा शिंदे गटाला सुटली, त्यामुळे गणेश गीते यांना माघार घ्यावी लागली. मात्र, मी निवडणुकीवर ठाम आहे, माझा प्रचारही चालू झाला आहे, हीच माझी रणनीती आहे. सर्वाधिक नगरसेवक हे माझ्यासोबत असतील आणि ते माझ्यासोबत येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा