BSNL Service Issue : पंधरा वर्षांपासून उभे राहीले मनोरे; तरीही बीएसएनएल सेवा ठप्प---! ग्राहक संतप्त
esakal June 05, 2026 11:45 PM

पाचोड - मोबाईल सेवा ग्रामीण भागात पोहोचून दोन दशकांचा कालावधी उलटला असतानाही पैठण तालुक्यातील पाचोडसह परिसरातील अनेक गावे आजही भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)च्या दर्जेदार मोबाईल सेवेपासून वंचित असल्याचे चित्र पाहवयास मिळते. विशेष म्हणजे पाचोड येथे तब्बल पंधरा वर्षांपूर्वी बीएसएनएलचा मोबाईल टॉवर उभारण्यात आला, मात्र आजतागायत तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने हजारो ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

पाचोडपासून पाच किलोमीटर परिसरातील थेरगाव, रांजणगाव दांडगा, वडजी, लिंबगाव, दादेगाव, हर्षी आणि दावरवाडी या गावांमध्ये जवळपास दहा हजारांहून अधिक मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची सेवा सुरू होईल, या अपेक्षेने अनेक ग्राहकांनी महागडे मोबाईल खरेदी केले. काहींनी तर बीएसएनएलचे सिमकार्ड मिळविण्यासाठी अतिरिक्त पैसेही मोजले. मात्र अपेक्षित सेवा न मिळाल्याने ग्राहकांचा भ्रमनिरास झाला आहे.

दरम्यान, बीएसएनएलचे टॉवर उभारले जात असताना परिसरात खाजगी दूरसंचार कंपन्यांनी मात्र संधी साधत आपले जाळे विस्तारले. सध्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांसारख्या कंपन्यांची सेवा सुरळीत सुरू असताना बीएसएनएलची सेवा मात्र वारंवार खंडित होत असल्याचे पाहवयास मिळते.

पाचोड-पैठण मार्गावरील दादेगाव, दावरवाडी आणि थेरगाव परिसरातही बीएसएनएलचे टॉवर उभारण्यात आले आहेत. मात्र हे टॉवर खाजगी कंपन्यांना भाडेतत्वावर देवून त्यांच्या सेवा सुरू 'बीएसएनएल'ची सेवा नेहमीच कोलमडते. एक वेळा बीएसएनएल चे नेटवर्क गायब झाले की त्याच्या दुरुस्तीकडे कुणी लक्ष देत नसल्याने महिना - महिना त्याची सेवा बंदच राहते. स्वतःचे टॉवर असताना 'बीएसएनएल' ची स्वतःची सेवा प्रभावीपणे उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी अनेक ग्राहकांनी 'बीएसएनएल'चे क्रमांक इतर कंपन्यांकडे पोर्ट केले असून याचा आर्थिक फटका शासकीय कंपनीलाही बसत आहे.

ग्राहकांच्या मते, मोबाईल रिचार्ज करे पर्यंत काही प्रमाणात रेंज मिळते; त्यानंतर मात्र नेटवर्कमध्ये बिघाड झाला की सेवा पूर्णपणे ठप्प होते. ग्रामीण भागातील ग्राहकांना वारंवार संपर्क तुटणे, इंटरनेट सेवा बंद पडणे आणि कॉल ड्रॉपचा त्रास सहन करावा लागत आहे.

विशेष म्हणजे पाचोड येथे कोट्यवधी रुपये खर्चून दूरध्वनी कार्यालय, अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि मोबाईल सेवा उभारण्यात आली होती. एका कनिष्ठ अभियंत्यासह दोन वायरमन व इतर कर्मचारी येथे कार्यरत होते. मात्र दहा वर्षांपूर्वी कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाल्यानंतर हे पद कायम रिक्तच राहिले. त्यानंतर येथील सर्व कामकाज पैठण कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आणि पाचोडचे कार्यालय केवळ शोभेची वास्तू बनून राहिले.

एकेकाळी हजारो लँडलाईन व मोबाईल ग्राहक असलेल्या या विभागातील ग्राहकसंख्या आता इतिहासजमा झाली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला, मात्र संबंधित अधिकाऱ्यांचे कायमच दुर्लक्ष होत आहे.

पंधरा वर्षांपासून उभे असलेले टॉवर, कोट्यवधींची उभारलेली यंत्रणा आणि रिकामे पडलेले कार्यालय यामुळे बीएसएनएलच्या ग्रामीण सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पाचोडसह परिसरातील नागरिकांनी तातडीने सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे. एकंदरीत 'बीएसएनएल' लँडलाईन इतिहासजमा होऊन ते लहान मुलांचे खेळणे बनले तर मोबाईलसेवा शेवटची घटका मोजत आहे.

सुधाकर सरोदे (ग्राहक) - 'मोबाईल रिचार्ज केले की एक - एक महिना रेंज राहत नाही, कुणाकडे तक्रार करावी तर उडवा उडवीची उत्तरे दिली जातात. खासगी मोबाईल कंपन्याची पाच मिनिटे रेंज गायब राहत नाही . सरकारी यंत्रणा खासगी मोबाईल कंपन्याशी मॅनेज असाव्यात.'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.