Ganja Seized : माथनी टोल प्लाझावर २.६१ कोटींचा गांजा जप्त; डीआरआयची कारवाई, दोघांना अटक, आंतरराज्यीय रॅकेट उद्ध्वस्त
esakal June 06, 2026 02:45 AM

नागपूर - अमली पदार्थ तस्करीविरोधातील मोठ्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) नागपूर प्रादेशिक पथकाने आंतरराज्यीय तस्करी रॅकेट उद्ध्वस्त करीत, माथनी टोल प्लाझा येथे २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा तब्बल ५२२ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.

माहितीनुसार, डीआरआयच्या मुंबई विभागांतर्गत नागपूर प्रादेशिक युनिटला ओडिशा-आंध्रप्रदेश सीमावर्ती भागातून महाराष्ट्रात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून टोळीवर पथकाने अनेक दिवसांपासून पाळत ठेवली. त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील मौदा जवळील माथनी टोल प्लाझा परिसरात संशयित ट्रक अडविण्यात आला. तपासादरम्यान एलपीटी-१६१८ ट्रकमध्ये विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या गुप्त कप्प्यांमध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला होता. तपासणी दरम्यान २४७ पॅकेट्स आढळून आले.

हे पॅकेट खाकी रंगाच्या प्लास्टिक टेपने गुंडाळले होते. संपूर्ण गांजा जप्त करून त्याचे वजन केले असता, ते ५२२ किलोपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले. यावेळी पथकाने गांजासह साडेआठ लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करीत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्यावर संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवीत अटक करण्यात आली. या रॅकेटचे आंतरराज्यात जाळे असल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांच्याकडून आणखी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

याच वर्षात तिसरी कारवाई

डीआरआय नागपूर युनिटने यापूर्वी केलेल्या दोन कारवाईत तब्बल १ हजार २५० किलो गांजा जप्त केला होता. त्या कारवायांमध्ये सुमारे ६.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता आणि मुख्य सूत्रधारासह चार जणांना अटक करण्यात आली होती.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.