वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची दैना, झाडे उन्मळली, घराचे पत्रेही उडाले; राज्यातील या भागाला पावसाने झोडपलं
Tv9 Marathi June 06, 2026 02:45 AM

राज्याच्या विविध भागात सध्या मान्सूनपूर्व पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे अनेक भागातील नागरिकांचे हाल होताना पहायला मिळत आहे. आज पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र अचानक आलेल्या रिमझिम पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. हवामानातील या बदलामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती-भिगवण रोडवर झाडे उन्मळली

बारामती शहरात अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे भिगवन रोडवरील अनेक झाडे उखडून पडली आहेत. पावसानंतर ज्या ठिकाणी झाडे पडली होती, त्या ठिकाणावरील झाडे बाजूला काढण्यात आली. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या वतीने ही झाडे हटवण्यात आली.

सोलापूर : करमाळ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

गेल्या काही दिवसांपासून असह्य उष्णतेचा सामना करणाऱ्या करमाळा शहरात आज पावसाने हजेरी लावली आहे. दुपारच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि आकाश ढगांनी भरून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांत तापमानाचा पारा वाढल्याने नागरिक कमालीचे हैराण झाले होते. आज झालेल्या या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.

अहिल्यानगर-पुणे महामार्गावर झाड कोसळले

शिरूर तालुक्यात आज मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्णता आणि उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. मात्र जोरदार वाऱ्यामुळे शिरूरमधील बोराडे मळा परिसरात अहिल्यानगर-पुणे महामार्गावर एक मोठे झाड कोसळले. झाड रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांनी झाड हटविण्याचे काम केले.

अहिल्यानगर : संगमनेर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

संगमनेर तालुक्यातील साकूर परिसराला आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारपीटीचा जोरदार फटका बसला. सुमारे तासभर सुरू असलेल्या वादळी पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची धावपळ उडाली. जांबुत खुर्द आणि जांबुत बुद्रुक येथे अनेक घरांचे पत्रे व कौले उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

इचलकरंजीत नागरिकांची दाणादाण

इचलकरंजी शहरामध्ये आज पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी पावसाने हजेरी लावली, मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतीच्या कामांना आता वेळ आला आहे.

मिरजमध्येही पावसाच्या सरी

सांगलीतील मिरज शहरामध्ये जोरदार पाऊस पडला. सकाळपासून उकाड्याने लोक हैराण झाले होते, सायंकाळनंतर वातावरणात बदल झाला आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्या दमदार एंट्रीमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत असून पावसाच्या आगमनामुळे शेतीच्या पेरण्यांच्या कामांना वेग येणार आहे.

इंदापूर शहरात वादळाचा कहर

पुण्याच्या इंदापुरात सोसाट्याच्या वादळाने अकलूज नाक्यावरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याशेजारील शॉपिंग सेंटरचे पत्रे उडून इतरत्र पडले. एका चार चाकी वाहनात लोखंडी गज घुसल्याने मोठे नुकसान झालं आहे. घटनास्थळी नगराध्यक्ष भरत शहा यांनी तात्काळ धाव घेतली असून नगरपरिषद प्रशासनाने परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तात्काळ मदत कार्य सुरू केलं आहे.

सातारा शहरासह ग्रामीण भागामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी

सातारा शहरासह ग्रामीण भागात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सकाळपासून सातारकर उकाड्याने हैराण झाले होते. आज संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. सातारा, कोरेगाव, जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडला. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळे शहरातल्या अनेक सखल भाग व रस्त्यावर पाणी साचले. तर अचानक पडलेल्या पावसामुळे सातारकरांची मात्र दैना उडाली. मान्सूनपूर्व पावसामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या सातारकरांना दिलासा मिळाला आहे.

धाराशिव,उमरगा शहरासह जिल्ह्यात पावसाची हजेरी

धाराशिव, उमरगा शहरासह जिल्ह्यातील काही ठिकाणी आज मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आणि उकाडा जाणवत होता, मात्र दुपारनंतर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेची तीव्रता कमी झाल्याचे दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.