वेळ जाणून घेण्यासाठी घड्याळ हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भिंतीवरील घड्याळ असो, मनगटी घड्याळ असो किंवा एखाद्या घंटाघरातील विशाल घड्याळ असो सर्व घड्याळांचा काटा एकाच दिशेने फिरताना दिसतो. ही दिशा म्हणजे उजवीकडे किंवा ‘क्लॉकवाइज’ दिशा. मात्र, घड्याळाचे काटे नेहमी याच दिशेने का फिरतात, हा प्रश्न अनेकांच्या मनात कधी ना कधी नक्कीच आला असेल.
यांत्रिक घड्याळांचा शोध लागण्याच्या अनेक शतकांपूर्वी लोक वेळ मोजण्यासाठी धूपघड्याळांचा वापर करत असत. धूपघड्याळामध्ये एका मध्यवर्ती दांड्याची सावली सूर्याच्या स्थितीनुसार एका डायलवर पडते. या दांड्याला ‘ग्नोमन’ असे म्हणतात. सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे दिवस जसजसा पुढे जातो, तसतशी या दांड्याची सावली डायलवर एका विशिष्ट दिशेने सरकत राहते. याच सावलीच्या हालचालीवरून लोक वेळेचा अंदाज घेत असत.
यांत्रिक घड्याळांनी स्वीकारली जुनी परंपरा
प्रत्यक्षात पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळताना दिसतो. उत्तर गोलार्धात सूर्याच्या या भासमान हालचालीमुळे धूपघड्याळाची सावली डावीकडून उजवीकडे सरकत जाते. हीच दिशा पुढे ‘क्लॉकवाइज’ म्हणून ओळखली जाऊ लागली.
14 व्या शतकात युरोपमध्ये पहिल्या यांत्रिक घड्याळांचा विकास झाला. त्या काळातील घड्याळ निर्मात्यांसमोर एक महत्त्वाचे आव्हान होते. लोक अनेक शतकांपासून धूपघड्याळांचा वापर करत होते आणि सावलीची हालचाल त्यांना परिचित होती. जर नव्या यांत्रिक घड्याळांचे काटे उलट दिशेने फिरवले गेले असते तर लोकांना वेळ समजून घेण्यात अडचणी आल्या असत्या. त्यामुळे घड्याळ निर्मात्यांनी काटे धूपघड्याळाच्या सावलीप्रमाणेच डावीकडून उजवीकडे फिरतील अशा पद्धतीने त्यांची रचना केली. यामुळे लोकांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे सोपे गेले.
घड्याळाचा काटा नेहमी उजवीकडेच का फिरतो?
घड्याळाचा काटा उजवीकडे फिरण्यामागे कोणताही योगायोग नसून त्यामागे शेकडो वर्षांचा इतिहास, धूपघड्याळांची परंपरा आणि पृथ्वीच्या फिरण्याशी संबंधित वैज्ञानिक कारणे आहेत. त्यामुळे पुढच्या वेळी घड्याळाकडे पाहताना त्याच्या काट्यांमध्ये दडलेला हा रंजक इतिहास नक्की आठवेल.