Hardik VS Suryakumar: २०२४ पासून सूर्यकुमार यादव-हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद? खळबळजनक अहवालामुळे क्रिकेट विश्वात चर्चा
esakal June 06, 2026 10:45 PM

Hardik Pandya VS Suryakumar Yadav: आज अजित आगरकर(Ajit Agarkar) यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या निवड समितीने (BCCI Selection Committee) आगामी इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय टी-२० संघाची (India T20I Team) शनिवारी (६ जून) घोषणा केली आहे.

भारतीय संघ जूनच्या शेवटी आयर्लंडमध्ये २ टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. ही मालिका १ जुलैपासून सुरू होणार आहे. यासाठी भारतीय संघात बरेच मोठे बदल करण्यात आले आहेत. सूर्यकुमार यादवला टी-२० कर्णधारपदावरून वगळण्यात आले असून त्याच्या जागी श्रेयस अय्यरला कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

आता भारतीय टी-२० कर्णधारपदाच्या चर्चेला एक नवीन वळण मिळाले आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, २०२४ च्या टी-२० विश्वचषक विजयानंतर रोहित शर्मानंतर झालेला कर्णधारपदाचा बदल अनेक घटनांवर अवलंबून होता आणि या जागेसाठी सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्यात चुरशीची लढत होती.

अहवालानुसार, रोहित शर्माचा उत्तराधिकारी म्हणून हार्दिक पंड्याकडे मोठ्या प्रमाणात पाहिले जात होते. कारण २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रोहित शर्मा इतर स्पर्धांवर लक्ष केंद्रित करत होता. त्यादरम्यान अनेक मालिकांमध्ये हार्दिक पंड्याने भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये मजबूत दावेदारी असूनही अखेरीस त्याला कायमस्वरूपी कर्णधारपद मिळाले नाही.

या अहवालात असे म्हटले आहे की नवीन भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांनी या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. परंतु गंभीर यांचे मत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्या मताशी जुळणारे होते. गौतम गंभीर यांना हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याबाबत कोणताही आक्षेप नव्हता.

या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की हार्दिक पंड्याबाबत काही शंका त्याच्या मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या कामगिरीमुळे निर्माण झाल्या होत्या. गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये आल्यानंतर त्याने रोहित शर्माची जागा कर्णधार म्हणून घेतली. मात्र, या निर्णयामुळे चाहत्यांनी वानखेडे स्टेडियमवर त्याच्याविरोधात नाराजी व्यक्त करत हूटिंग केले. तसेच, त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला.

या अहवालानुसार आणखी एक बाब समोर आली आहे. अहवालात म्हटले आहे की एका वरिष्ठ भारतीय क्रिकेटपटूने कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याऐवजी सूर्यकुमार यादवच्या नावाला पसंती दिली होती. मात्र त्या खेळाडूचे नाव उघड करण्यात आलेले नाही. त्यांच्या पाठिंब्यामुळे सूर्यकुमारची बाजू अधिक मजबूत झाली.

Team India T20 Captain: सूर्यकुमारला T20 कॅप्टन्सीवरून काढणार, मग भारताच्या नेतृत्वासाठी पर्याय कोण? हे तिघे शर्यतीत आघाडीवर

अहवालात असेदेखील म्हटले गेले आहे की हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून संबंध फारसे चांगले नव्हते. एका मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या दोन वर्षांपासून हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यात सर्व काही सुरळीत नव्हते. भारतीय क्रिकेटमधील अनेक लोकांना याची कल्पना होती, असे त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

हे दोघेही अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमचा भाग आहेत. आयपीएल २०२६ मध्ये हार्दिक पंड्याकडे संघाचे कर्णधारपद होते, तर सूर्यकुमार यादव उपकर्णधार होता. हार्दिक दुखापतीमुळे एखादा सामना खेळू शकत नसल्यास सूर्यकुमार यादव संघाची धुरा सांभाळत होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.