महाड - शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी आज रायगडावर दुचाकीवरून येत असलेल्या एका शिवप्रेमीचा अपघातात मृत्यू झाला. तर अन्य वेगवेगळ्या अपघातात तीन शिवप्रेमी जखमी झाले आहेत.
रायगडावर आज 6 जूनला शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यभरातून अनेक शिवप्रेमी गडावर दाखल होत असतात अशाच प्रकारे दुचाकी वरून गडावर येणाऱ्या शिवप्रेमींचा अपघात झाला आहे.
मृत पावलेल्या शिवप्रेमीचे नाव शुभम शेडगे (वय-28) असे असून तो पुणे जिल्ह्यातील यवत येथील रहिवासी आहे. गेले अनेक वर्षांपासून शुभम दरवर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यास रायगडावर उपस्थित राहत असे. यावर्षी देखील तो या सोहळ्यात उपस्थित राहण्याकरता रायगडकडे जात असताना पिंपळदरी येथे झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला.
त्याला पुढील उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तिथे या शिवप्रेमीची प्राणज्योत मालवली. अशाच प्रकारे तळोशी येथे रायगड कडे जात असलेले इस्लामपूर येथील वैभव पवार व राजकुमार पवार या दोघांनाही अपघात झाला. तर अन्य दौंड येथील रहिवासी कुमार डोरघे याला देखील अपघात झाला आहे. हे सर्वजण दुचाकीवरून प्रवास करत होते. जखमींचे प्रकृती गंभीर असल्याने त्यांना डेरवण व अलिबाग येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.