पुणे - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुणे विभागाने केलेल्या कारवाईत शहरातील १७ ठिकाणी एकाच वेळी धाडसत्र राबवून तब्बल ४७ लाख ३६ हजार १८ रुपये किमतीचा संशयित खवा, पनीर, चीज ॲनालॉग (वनस्पतीजन्य तेल व इतर पदार्थांचा वापर करून तयार केलेले चीज) आणि तूप जप्त करण्यात आले आहे. शहरातील सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील पनीर व खवा विक्रेत्यांच्या आस्थापनांवर ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. यावेळी तपासणीदरम्यान विनालेबल असलेला साठा, खरेदीची बिले नसलेला साठा, अस्वच्छ वातावरणात साठवून ठेवलेले अन्नपदार्थ तसेच भेसळीचा संशय असलेला साठा जप्त करण्यात आला आहे. या आस्थापनांमधून खवा, पनीर, चीज ॲनालॉग आणि तूप यांसारख्या अन्नपदार्थांचे एकूण ३५ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया करण्यात येत आहे. त्याचे नमुने जप्त केले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आणि निकृष्ट, भेसळयुक्त अन्नपदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या आस्थापनांवर भविष्यातही अशीच कारवाई सुरू राहील, असा इशारा पुणे विभागाचे ‘एफडीए’ (अन्न विभाग) चे सह आयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
शहरात जप्त करण्यात आलेला दुग्धजन्य पदार्थांचा साठा -
अन्नपदार्थ – वजन – किंमत
१. पनीर – २,८०६ किलो – ७ लाख ५५ हजार ६०५
२. खवा – १३ हजार १२७ किलो – ३४ लाख ३५ हजार १५२
३. चीज ॲनालॉग – १३८ किलो – २८ हजार ७२५
४. तूप – ९६० किलो – ५ लाख १६ हजार ५३६
एकूण पदार्थ ४ – १७ हजार ३१ किलो – ४७ लाख ३६ हजार