पुणे - राज्यातील ‘आयटीआय’मधील प्रवेश प्रक्रियेचा कोणता टप्पा सुरू आहे, पुढे कोणता टप्पा सुरू होणार आहे, याबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती आता विद्यार्थी-पालकांना प्रवेशाच्या पोर्टलवर उपलब्ध झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ‘ॲक्टिव्हिटी टाईमलाइन’ हे सेक्शन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता प्रवेश प्रक्रियेची माहिती अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकणार आहे.
शासकीय आणि खासगी आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत यंदाच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील एकूण एक हजार चार आयटीआयमधील एकूण एक लाख ५७ हजार ६६४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील ही प्रवेश प्रक्रिया प्रवेशासाठी २१ मे पासून सुरू झाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना २३ जूनपर्यंत व्यवसाय आणि संस्थानिहाय पर्याय, प्राधान्य सादर करता येणार आहे. प्राथमिक गुणवत्ता यादी २५ जूनला, तर गुणवत्ता यादी २६ जूनला सादर होणार आहे.
‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी प्रत्येक शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये सकाळी १० ते ११ या वेळेत निःशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे. सर्व शासकीय आणि मान्यताप्राप्त खाजगी आयटीआयमधील संलग्न व्यवसाय अभ्यासक्रमांच्या तुकड्यांची यादी ‘https://admission.dvet.gov.in’ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी यांनी सांगितले.
राज्यातील आयटीआय प्रवेशासाठी उपलब्ध जागा -
तपशील : ‘आयटीआय’ची संख्या : प्रवेशासाठी उपलब्ध जागा
शासकीय : ४१८ : ९७,०८८
खासगी : ५८६ : ६०,५७६
एकूण : १,००४ : १,५७,६६४
आतापर्यंत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या -
ऑनलाइन नोंदणी केलेले : १,१२,२४६
अर्ज पूर्ण केलेले : ९१,८५९
शुल्क भरलेले : ८७,९७२
पुणे जिल्ह्यातील आयटीआयमधील प्रवेशाच्या जागा -
तपशील : ‘आयटीआय’ची संख्या : प्रवेशाच्या जागा
शासकीय : १६ : ५,५८४
खासगी : ४६ : ६,८६८
एकूण : ६२ : १२,४५२
प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी संकेतस्थळ -
https://www.dvet.gov.in/
https://admission.dvet.gov.in/